बिहारमध्ये राजद नेत्याच्या भावाची हत्या

 

पाटणा : वृत्तसंस्था । :बिहार विधानसभा निवडणूकसाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान सुरु असताना राष्ट्रीय जनता दलाचा नेता बिट्टू सिंह याच्या भावाची गुंडांनी दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली. गोळीबारानंतर परिसरात दहशतीचं वातावरण आहे.

पूर्णियाच्या धमदाहा मतदारसंघांतील सरसी भागात ही घटना घडल्याचं समजतंय. गुंडांनी बेनी सिंह याच्यावर गोळीबार केल्यानंतर तत्काळ ते घटनास्थळावरून पसार झाले. आरजेडी नेता बिट्टू सिंह हा देखील पोलिसांच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत सामील आहे.

मतदानादरम्यान मतदान केंद्राजवळ दोन गटांत झालेल्या बाचाबाचीनंतर वाद हाणामारीपर्यंत पोहचला. त्यानंतर गोळीबारही करम्यात आला. या घटनेत बेनी सिंह याला गोळी लागली. त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

पोलिसांना घटनास्थळी दाखल होत त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. आरजेडी नेता बिट्टू सिंह उर्फ मयंक सिंह याचं नाव पोलिसांच्या मोस्टवॉन्टेड यादीतही सामील आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात प्रवेश करताना एके ४७ आणि कार्बाइनसहीत पोलिसांनी त्याला अटक केली होती.

बिहार निवडणुकीदरम्यान गेल्या महिन्यात शिवहारमध्येही जनता दलाच्या उमेदवार आणि त्याच्या एका समर्थकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. उमेदवार प्रचारासाठी बाहेर पडला असताना त्याच्यावर कट रचून हल्ला करण्यात आला. गोळीबारानंतर उमेदवाराच्या समर्थकांनी एका मारेकऱ्याला गाठलं. जमावाकडून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत आरोपीचाही मृत्यू झाला होता.

दरम्यान, आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. येत्या १० नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

Protected Content