बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा आपल्या राज्यात लक्ष घाला

सोलापूर : वृत्तसंस्था । केंद्र सरकार आणि राज्य सरकार पूरग्रस्त जनतेसाठी काय करेल याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही ज्या राज्याचे आहात त्यासाठी आधी काम करा. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा आपल्या राज्यात लक्ष घाला असा आजच्याच दिवसातला दुसरा दणका फडणवीसांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे .

तुम्ही राज्याचे विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्रातील जबाबदार नेते आहात, याचे भान राहू द्या, असा टोलाच मुख्यमंत्र्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस सध्या नियमितपणे बिहारला जात आहेत. तसं त्यांनी थोडं दिल्लीतही जावं. ते दिल्लीत गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील घराबाहेर पडतील, असा खोचक सल्लाही मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना दिला.

राज्यावर परतीच्या पावसामुळे ओढवलेल्या पूरसंकटात बळीराजा कोलमडून पडलेला असताना शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधक सातत्याने राज्य सरकारला लक्ष्य करत असताना सोलापूर येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीची धुरा दिली आहे. बिहारचे प्रभारी म्हणून ते काम पाहत आहेत. तिच नस पकडत मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांना टोला लगावला.

फडणवीसही पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. आज बारामतीत त्यांनी स्थितीची पाहणी केली. त्यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याबद्दल शरद पवार यांनी समर्थन केले होते. मुख्यमंत्री मुंबईत थांबून राज्याचा आढावा घेत असतात. आम्हीही त्यांना वेळोवेळी माहिती देत असतो, असे पवार म्हणाले होते. त्यावर सरकारचा बचाव करण्याचे आणि नाकर्तेपणा लपवण्याचे एकमेव काम पवारांना आहे, असे फडणवीस म्हणाले. केंद्र सरकार तर पूरग्रस्तांना मदत देईलच, पण राज्य सरकार काही मदत करणार आहे की नाही? तुमची जबाबदारी झटकून कसे चालेल?, असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला होता. माध्यमांनी त्याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले.

Protected Content