राजकारणाचे चित्र समाधानकारक नाही – आ. खडसे

चाळीसगाव ( प्रतिनिधी)- आज-काल राजकारणाचे चित्र समाधानकारक नसून निष्ठावंत कार्यकर्त्यांची उणीव भासत आहे, ज्या लोकांना स्पर्श करून आपण मोठे केले तेच आज आम्हाला विसरत असल्याची खंत आ. एकनाथराव खडसे यांनी तालुक्यातील पिंपरखेड येथील सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणात आयोजित वाडीलाल राठोड यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी व्यक्त केली.

भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते तथा सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव वाडीलाल राठोड यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे आज अनावरण खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना नाथाभाऊ म्हणाले की वाडीलाल राठोड आणि माझी चाळीस वर्षांची मैत्री होती, भाजपात चाळीसगाव तालुक्‍यात कुठेही दिसत नसणाऱ्या काळात वाडीलाल राठोड यांनी मोजक्या सहकाऱ्यांसह पक्षवाढीसाठी तालुक्यात मोठे योगदान दिले होते. या तालुक्यात तिकीट वाटप करताना राठोड यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. अशा मोठ्या माणसांची पक्षाला आता गरज होती, मात्र ते वेळेपूर्वी गेल्याने समाजाचे व पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. हल्लीच्या काळात राजकारणाचे चित्र समाधान कारक नसून जुन्यांना विसरण्याचे काम नव्या लोकांकडून होत असल्याचे नमूद करत सूडबुद्धीचे राजकारण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र राठोड यांनी वाडीलाल राठोड यांचा पुतळा उभा करून येणाऱ्या पुढील पिढीस शून्यातून जग निर्माण करणाऱ्या वाडीलाल राठोड यांचा आदर्श शिक्षकांना विद्यार्थ्यांना सांगता येईल व विद्यार्थी त्यांचा आदर्श घेतील, असेही सांगितले.

खासदार ए.टी. पाटील, माजी मंत्री एम. के. पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, माजी आमदार बी. एस. पाटील, सहकार महर्षी उदेसिंग राजपूत, माजी आमदार साहेबराव घोडे, सेवा सहकारी शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जी. जी. चव्हाण, पवार चित्रपट निर्माते सी. के. पवार, बेलगंगा कारखान्याचे चेअरमन पाटील, भाजपा किसान मोर्चाचे राज्य सरचिटणीस कैलास सूर्यवंशी, राज्य महिला आयोग सदस्य देवयानी ठाकरे, श्याम चैतन्यजी महाराज, शिवसेना तालुका प्रमुख रमेश चव्हाण, भाजपा नेते सतीश दराडे, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर ,भाजपा तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, नगराध्यक्ष आशालाता विश्वास चव्हाण, अविनाश चव्हाण, योगेश पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे, बाजार समिती सभापती रवींद्र पाटील, विश्वास चव्हाण, राजेंद्र चौधरी, नाना पवार, राकेश नेवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, रामचंद्र जाधव, जगदीश चौधरी, श्याम देशमुख, शेषराव पाटील, आर. एल. पाटील, वसंतराव चंद्रात्रे, प्रमोद पाटील, संजीव निकम, महेंद्र सिताराम पाटील, अरुण पाटील, आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र राठोड यांनी केले तर सूत्रसंचालन मनोहर आंधळे यांनी केले.

Add Comment

Protected Content