पाटणा : वृत्तसंस्था । केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये देखील कोरोना लस देण्याची परवानगी दिली आहे. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये लस खरेदी करावी लागेल, बिहार सरकारने खासगी रुग्णालयात देखील कोरोनाची लस मोफत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात केली आहे.
“पूर्ण बिहारमध्ये कोरोनाची लस पूर्णपणे मोफत दिली जाईल. खासगी रुग्णालयांमध्ये देखील मोफत लसीकरणाची सेवा उपलब्ध करून दिली जाईल. याचा पूर्ण खर्च राज्य सरकारकडून उचलला जाईल”, अशी घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. बिहारमधील निवडणुकांवेळी अशा प्रकारचं आश्वासन देखील नितीश कुमार यांनी दिलं होतं.
केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार, ‘देशात सर्व सरकारी रुग्णालये आणि लसीकरण केंद्रांवर सरकारने ठरवलेल्या टप्प्यांनुसार मोफत लसीकरण केलं जाईल. त्यासोबतच आता खासगी रुग्णालयांना देखील लसीकरणाची परवानगी असेल. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये घेतल्या जाणाऱ्या लशीसाठी २५० रुपये मोजावे लागतील. यामध्ये १०० रुपये सेवाशुल्क आणि १५० रुपये लशीचे शुल्क यांचा समावेश असेल’, असं जाहीर करण्यात आलं आहे.