सी.ए.ए.प्रकरणी हिंसाचाराला काँग्रेस आणि आप जबाबदार – जावडेकर

prakash javadekar

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेला काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच या हिंसेप्रकरणी काँग्रेस आणि ‘आप’ने देशाची माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.

 

दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे नेते गप्प आहेत. कारण या हिंसेला हे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लोकांना चिथावणी देण्याचे काम केले असल्याचा आरोपही जावडेकर यांनी केला आहे.

दिल्लीत ‘जामिया’मध्ये काँग्रेस नेते आसिफ खान आणि आपचे आमदार अमानतुल्लांवर लोकांना भडकावण्याचा आरोप आहे. दिल्लीच्या सीलमपूरमध्ये हिंसा होत असताना तिथे काँग्रेसचे मतीन अहमद आणि आपचे इशराक खान उपस्थित होते. जामा मशिदीत काँग्रेसचे महमूद पराचा उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस आणि आपने देशाची माफी मागायला हवी, असे जावडेकर म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस नेते जे.पी. अग्रवाल यांनी जावडेकरांवर तत्काळ पलटवार केला आहे. काँग्रेसवर हिंसा भडकावल्याचा आरोप करणाऱ्यांनी आधी भाजपच्या किती नेत्यांवर बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत, याची माहिती द्यावी. दिल्लीत हिंसा झाल्याचा आरोप कशाला करता ? तुमच्याकडे चौकशीचे अधिकार आहेत. तुम्ही या प्रकरणाची खुशाल चौकशी करावी. तुम्हाला कुणी मनाई केली आहे, असे आव्हानच अग्रवाल यांनी भाजपला दिले आहे. भाजपच्या नेत्यांनी देशाची दिशाभूल करणे थांबवले पाहिजे. दिल्लीतील वसाहतींच्या प्रश्नावर भाजप आणि आप राजकारण करत आहेत. तर इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेस या प्रश्नावर काम करत असल्याचेही अग्रवाल यांनी यावेळी स्पष्ट केले.

Protected Content