बहुजन एकजुटीसाठी शरद पवारांकडून छत्रपती – होळकर विवाहाचे उदाहरण

 

पुणे : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जेजुरीत बहुजनांना एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न करताना दिसले. त्यांनी यावेळी राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या जातीय द्वेषाच्या वातावरणावर अप्रत्यक्ष  निशाणा साधला.  छत्रपती – होळकर  विवाहाचा दाखला देत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला

 

. ते जेजुरीत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं उद्धाटन करण्यासाठी आले होते.

 

यावेळी त्यांनी अहिल्यादेवी यांच्या कामाची सविस्तर माहिती देत अहिल्यादेवी जागतिक स्तरावर छाप सोडणाऱ्या महिला राज्यकर्त्या असल्याचं म्हटलं

 

शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्रात पहिला आंतरजातीय अहवाल छत्रपती शाहू महाराजांनी लावला. शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा होळकर कुटुंबात विवाह लावला. आज मात्र समाजात जातीय विषमता निर्माण झालीय. ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.”

 

 

“एका ऐतिहासिक कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र आलोय. अहिल्यादेवींनी इतिहास घडवून स्त्री शक्तीचं महत्व समाजाला दाखवलं. त्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातले लोक श्रद्धेने येथे येतात. या प्रांगणात येणाऱ्या प्रत्येकाला हा पुतळा प्रेरणा देईल. हा परिसर व्यवस्थित करण्यासाठी माजी-आजी आमदारांनी प्रयत्न केले. अनेक कामे जेजुरीत होतायत. हा परिसर अनेक दृष्टीने चांगला होतोय या गोष्टीचा आनंद वाटतो,” असं शरद पवार यांनी नमूद केलं.

 

शरद पवार म्हणाले, “जामखेड तालुक्यातील चोंडीला अहिल्याबाई यांचा जन्म झाला. त्यांचे वडील माणकोजीराव शिंदे यांनी मुलींना शिकवण्याचं काम केलं. मल्हारराव होळकर एकदा चोंडीला थांबले. त्यांनी चुणचुणीत मुलगी बागडताना पाहिली. त्यांनी आपले चिरंजीव खंडेराव यांच्यासाठी तिची निवड केली आणि सून म्हणून आणलं. दुर्दैवाने खंडेराव यांना लढाईत मृत्यू आला. मल्हारराव होळकर यांनी सती जायची पद्धत असताना सती न जाण्याचा आग्रह धरला. अहिल्याबाई यांनी प्रांताची जबाबदारी घेतली. इंग्रजी राजवटीशी संघर्ष केला. पेशव्यांनी इंग्रजांशी जवळीक वाढल्यानंतर त्यांनी त्यांना खडसावलं. महेश्वर, इंदौर ही शहरे त्यांनी उत्तम बनवण्याचा प्रयत्न केला.”

 

“महाराष्ट्राची जबाबदारी असताना मी 50 टक्के महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. अनेकांना ते आवडलं नाही. त्यावेळी एकच उत्तर दिलं. पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर इंदिरा गांधींनी देशाला ओळख मिळवून दिली. कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडे नाही. आपल्याला समाज उभा करायचाय. स्त्री आणि पुरुष एकत्र करुन अहिल्याबाईंचा आदर्श समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे,” असंही शरद पवार यांनी सांगितलं.

 

शरद पवार म्हणाले, “अहिल्याबाईंची ओळख त्या काळात केवळ देशात नव्हती, तर जगभरात होती. त्यांची तुलना रशियाची राणी, ब्रिटेनच्या राणीशी करण्यात आली. जगातील कर्तुत्ववान स्त्रीयांपैकी अहिल्याबाई होत्या. इंग्लिश लेखकाने त्यांचं हे मोठेपण अधोरेखित केलं. अहिल्याबाईंनी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय दिला, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं.”

 

“अहिल्याबाईंनी जेजुरीच्या खंडेरायच्या परिसराला विकसित करण्याचं काम केलं. त्यांनी हातातील सत्तेचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी केला.  २० वर्षांपूर्वी उमाजी नाईक पुतळ्याचं उद्घाटन आपण केलं. आज अहिल्याबाई होळकर यांचा पुतळ्याचं उदघाटन ही सन्मानाची बाब आहे,” असंही ते म्हणाले.

Protected Content