कोरोनामुळे राज्यात चिंतेचे वातावरण नाही, पण धुळवड मर्यादेत खेळा ; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार सर्व उपाययोजन करत आहे. मुंबई, पुणे, नागपूर येथे करोनाचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत. जनजागृती करण्यासाठी जाहिराती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे गरजेचे असून गरज नसताना गर्दी करू नका आणि धुळवडही मर्यादेत खेळा,’ असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केले.

 

‘कोरोना’ व्हायरसमुळे महाराष्ट्रात पसरलेल्या भीताच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत निवेदन केले. कोरोनामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, राज्यात चिंतेचे वातावरण नाही. राज्य सरकार आवश्यक त्या उपाययोजना करतेच आहे. पण नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. होळी हा आनंदाचा सण आहे. त्यात अमंगल सर्व जाळून टाकण्याची प्रथा आहे. कोरोनाचे संकटही यंदाच्या होळीत जळून खाक होईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. ‘यापूर्वी स्वाइन फ्लूच्या संकटाच्या वेळी दहीहंडी उत्सवावर मर्यादा आल्या होत्या. अनेक मंडळांनी स्वयंस्फूर्तीनं दहीहंडी उत्सव रद्द केले होते. यावेळी हे भान राखले जाईल. नागरिकांनी तसे ते राखावे, असे आवाहनही उद्धव यांनी केले आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, नागपूर येथे कोरोनाचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत. जनजागृती करण्यासाठी जाहिराती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयातही स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्याची विनंती करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Protected Content