पुणे प्रतिनिधी । शेतकर्यांच्या मालाला किफायतशीर भाव मिळावा तसेच सेंद्रीय पध्दतीचा शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहचावा यासाठी वसुंधरा समूहाने आघाडी घेतलेली असून अवघ्या १५ दिवसांमध्ये चार शॉपीज सुरू करण्यात आल्या आहेत.
वसुंधराचे यश
शेतकरी अन्न धान्य पिकवतो पण त्याला त्याच्या मालाचे मार्केटींग करता येत नाही ही बाब लक्षात घेवून पुरंदर येथील शेतकरी संजय कुंभारकर यांनी फेसबुकवर शेतकरी राजा समूह तयार केला सदर समूहाच्या माध्यमातून त्यांनी १०० शेतकर्यांना एकत्र करीत वसुंधरा समूह फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. सुरवातील भोर तालुक्यातील भूतोंडे येथे शेती खरेदी केली.
शेतकर्यांना मदत
त्यानंतर शेतकर्यांशी चर्चा केल्यावर शेतमालास विक्री करण्यासाठी येत असणार्या अडचणी पाहता वसुंधरा समूहाने स्वतः शेतमाल विक्री करण्यासाठी पहिले आऊटलेट माणिकगड ,बोपगाव येथे उभारले सदर शॉपीचे बहुचर्चित मराठी चित्रपट मुळशी पॅटर्नचे प्रमुख कलावंत प्रविण तरडे यांनी केले होते. दुसरी शॉपी दत्त नगर आंबेगाव कात्रज येथे सुरू करण्यात आली असून याचे उदघाटन राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय बापू शिवतरे यांनी केले होते. तिसरी शॉपी सांगरीया सोसायटी, हिंजवडी परीसरात उभारलेली आहे यासर्व शॉपींना चांगला प्रतिसाद मिळाल्याने चौथी शॉपी करिष्मा चौक, कर्वै रोड पुणे येथे सुरू करण्यात आली आहे.
चौथी शॉपी सुरू
वसुंधरा समूहाच्या कोथरूड येथील चवथ्या शॉपीचे उदघाटन वसुंधरा समूहाचे जेष्ठ सभासद दयानंद निंभोळकर व प्रगतिशील शेतकरी व महाराष्ट्र सरकारचा कृषिरत्न पुरस्कार प्राप्त सुनील मारणे यांच्या हस्ते झाले.यावेळी विजय भापकर, अजय टिलेवाले, वसंत सुसर, संदीप कुंभार, पूजा यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
भविष्यातील प्रकल्प
लवकरच कृषी पर्यटन व राईस मिल सुरू करणार आहोत असे कुंभारकरांनी कळविले आहे. सदर उपक्रमासाठी संजय कुंभारकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुनील डांगे, महेश पोमन,वैभव इंगळे, प्रदीप दोरगे, संजय नाना जगताप, सूर्यकांत भांडे पाटील, अजित गायकवाड, मेहनत घेत आहेत.