बस व कारच्या अपघातात एक ठार

एरंडोल प्रतिनिधी । ओव्हरटेकच्या नादात भरधाव वेगाने धावणारी कार बसवर आदळून झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील धारागीर गावाजवळ घडला.

याबाबत वृत्तांत असा की, माऊंटअबू येथे जाण्यासाठी औरंगाबाद येथून दोन कार एरंडोलमार्गे निघाले होते. यातील एक कार पुढे निघून गेली होती. कार (एमएच २० ईवाय २८६३) धारागीर गावाजवळील साई हॉटेलजवळून जातांना पुढे चालणार्‍या ट्रकला ओव्हरटेक करत पुढे निघण्याचा प्रयत्न करीत असतांना अचानक समोरून येणारी बस क्रमांक एमएच १४ बीटी २०४२ आल्याने कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार सरळ बसवर धडकली. ही दुर्घटना सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास घडली.

या अपघातामध्ये कार चालकाच्या उजव्या बाजून बसलेले दिलीप सोपानराव घाडगे रा. रा.लक्ष्मीनगर, इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्यामागे, गारखेडा परिसर, औरंगाबाद हे जागीच ठार झालेत. तर लता गोरे, देवशाला घाडगे, सत्यभामा घाडगे सर्व रा. औरंगाबाद आणि संदीप पाटील रा.धुळे हे जखमी झाले. मयत हे औरंगाबाद येथील रहिवाशी असून मालेगाव जि. नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते. यातील जखमींना मदत करून खासगी वाहनाने एरंडोल येथील कल्पना हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत बसचालकाच्या फिर्यादीवरून कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content