जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्रातील महिला बचतगट, मायक्रोफायनान्स गटाचे कर्ज केंद्र सरकारने माफ करावे, या मागणीसाठी आज मंगळवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीपल्स फाउंडेशनच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये लोकांना हाताला काम नाही, त्या काळात घरातील होते तेवढे जमापुंजी दैनंदिन गरजेसाठी खर्च झाली आहे. त्यात दोन जेवण वेळचे जेवण, आजारपण, शालेय शिक्षण ऑनलाइन केले गेले, दोन मुले असणाऱ्या परिवाराची तर तारेवरची कसरत झाली. बऱ्याच परिवारात रोजच्या गरजा पूर्ण करता येत नाही तर तिथे मोबाईल कुठून घ्यायचा. बरीच मंडळी भाड्याने राहतात, भाड्यासाठी घर मालकांचा तगादा आणि आर्थिक आवक बंद असल्यामुळे घरभाडे कसे द्यावे. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी कर्ज उपलब्ध केले जात आहे. यात लहान-मोठे लघु उद्योग व्यवसाय करून महिला परिवाराला हातभार लावत आहे. प्रत्येक कर्ज घेणाऱ्या महिला या स्वाभिमानी आहेत. आजवर घेतलेले कर्ज वेळेवर फेडले गेले, मात्र लागले लॉकडाऊनपासून व्यवसाय देखील बंद पडले आहे. आणि आवक नसल्यामुळे बँकेचा हप्ता भरायचा कुठून हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे राज्यातील महिलांचे बचत गटाचे कर्ज केंद्र सरकारने माफ करून त्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करावे आणि नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी हातभार लावावा, अशी मागणी दी पीपल्स फाउंडेशनच्या अध्यक्षा गायत्री सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर संयम महिला बहुउद्देशीय संस्थेच्या चारुलता सोनवणे, जननायक फाउंडेशन, छावा मराठा युवा महासंघ आणि अमोल कोल्हे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.