फोन टॅपिंग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले ; काँग्रेसचा आरोप

 

मुंबई: वृत्तसंस्था । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केला आहे. फोन टॅपिंग करूनच कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यात आलं. केंद्र सरकारने फोन टॅपिंगचा गैरवापर केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. 

 

नाना पटोले यांनी हा बॉम्ब टाकला. फोन टॅपिंगचा दुरुपयोग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने याचा गैरवापर केला. अनेकांचे फोन टॅप केले. ही गंभीर बाब आहे. संवैधानिक व्यवस्थेविरोधातील हे कृत्य आहे. त्यामुळे संबंधितांनी राजीनामा द्यायला हवा. चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.

 

पॅगेसास प्रकरण गंभीर आहे. उद्या गुरुवारी आम्ही राजभवनाबाहेर धरणे धरणार आहोत. राज्यपालांना निवेदन देणार आहोत. राष्ट्रपतींनीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

 

विधानसभेत मी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला होता. माझेही फोन टॅप करण्यात आले होते. त्यावर सरकारने चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने ही समिती लवकर स्थापन करावी आणि माहिती समोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली.

 

त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा पुनरुच्चार केला. या निवडणुका स्वबळावर लढण्याचं आमचं ठरलं आहे. त्याची तयारीही आम्ही सुरू केली आहे. पक्ष नेतृत्वाच्या आदेशाचं पालन सर्वांनाच करावं लागतं. त्यामुळे सगळे नेते त्यासाठी तयार आहेत, असंही ते म्हणाले.

 

कोरोना रोखण्यात आलेलं अपयश झाकण्यासाठी ते दुसऱ्यावर जबाबदारी ढकलत आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लस पुरवण्याची सर्व व्यवस्था केंद्राने आपल्या हातात ठेवली होती. राज्यात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही असं प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र सरकारने कोर्टात सादर केलं, त्यात तथ्य आहे. – महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही. नाशिकमध्ये जी घटना झाली तो अपघात होता. तिथे भाजपची सत्ता महापालिकेत आहे. ऑक्सिजन यंत्रणा उभारण्यात तिथे भ्रष्टाचार झाला. आपल्या शेजारी भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश, गोव्यात ऑक्सिजन अभावी लोकं मेली. या सगळ्या पापाचे भागीदार भाजप आहे, अशी टीका त्यांनी केली.

 

लोकांना लस मिळत नाही. आपलं शत्रू राष्ट्र पाकिस्तानला लस मोफत दिली जाते. त्यामुळे आपल्याला लॉकडाऊनला सामोरं जावं लागतं. लोकांचा रोजगार बुडत आहे, लोक देशोधडीला लागले आहेत. या सगळ्याला मोदी सरकार जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

 

Protected Content