फैजपूर ता.यावल प्रतिनिधी । शहरातील मयत पावलेल्या व्यक्तीचा तपासणी अहवाल सोमवारी रात्री उशीरा प्राप्त झाला. मयताचा अहवाला कोरोना पॉझिटीव्ह आल्याने परीसरात खळबळ उडाली होती. शहरात बाधितांचा आकडा १० पोहचला आहे. वास्तव्यास असलेला परिसर आरोग्य यंत्रणेकडून सील करण्यात आला होता.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील इस्लामपुरा इदगाळ रोड परिसरातील एका व्यक्तीचा पाच दिवसांपुर्वी मृत्यू झाला होता. दरम्यान, अंत्यसंस्कार करण्यापुर्वी त्या व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले होते. सोमवारी ८ जून रोजी रात्री उशीरा त्याचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झालेत. या वृत्ताला मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. मृत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील नातेवाईकांना आरोग्य प्रशासनाने क्वारंटाईन केले असून सदरील परिसर सील करण्यात आले. दरम्यान, सोमवारीच खुशालभाऊ रोडवरील एका व्यावसायिकाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने तो परिसर सील करण्यात आला होता. त्यामुळे आता शहरातील कंटेनमेंट झोनची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ही शहरवासीयांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. फैजपूर शहरातील कोरोना बाधितांचा आकडा आता १० पोहचला आहे. अशी माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिलीय.