फैजपुरात कोरोनाचा शिरकाव; परिसरात खळबळ; प्रशासनातर्फे उपाययोजना

फैजपूर, ता. यावल निलेश पाटील । आजवर कोरोनाचा एकही रूग्ण नसल्याने निर्धास्त असलेल्या फैजपुरकरांना आज एक बाधीत रूग्ण आढळून आल्याने धक्का बसला आहे. दरम्यान, रूग्णाचा रहिवास असणार्‍या भागात प्रशासनाने सील करण्यास प्रारंभ केला असून जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत माहिती अशी की, आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये फैजपूर येथील एक रूग्ण बाधीत असल्याचे वृत्त आल्याने शहरासह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. संबंधीत रूग्ण ही सिंधी कॉलनी भागातील महिला असून ती काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथून आल्याचे कळते. दरम्यान, ही महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे कळताच प्रशासनाने सिंधी कॉलनी परिसर सील करण्यास प्रारंभ केला आहे.

फैजपूर येथील प्रशासनाने आजवर शहरात एकही कोरोना बाधीत होऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. विशेष करून प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले हे आपल्या सहकार्‍यांसह जनतेने लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांना महसूल, नगरपालिका, पोलीस, आरोग्य आदी विविध खात्यांनी सहकार्य केल्याने आजवर फैजपुरात कोरोनाचा शिरकाव नव्हता. तथापि, आज एक बाधीत रूग्ण आढळून आल्याने शहरवासियांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखीत झाले आहे. तसेच लोकांनी घाबरून न जाता लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकताही यातून दिसून आली आहे.

Protected Content