फरार टोळीतील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | गेल्या वर्षभरापासून एका गुन्ह्यातील फरार असलेल्या टोळीतील प्रमुख संशयित आरोपीला पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, १८ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास शहरातील  छाजेड ऑईल मिलच्या मागे, हैदर अली आसिफ अली, नदीम खान साबिर खान उर्फ गोल्डन,  सुलतान शेख रहेमान शेख, वाजिद खान साबिर खान, शेख नवाज शेख सलीम व इतर दोन अनोळखी इसमांनी एकत्रीत येवुन, फिर्यादी वैभव अरुण रोकडे (वय-२४ ) व साक्षीदार यांनी संशयित आरोपींना पृथ्वी कुमावत याला मारहाण का केली? याबाबत विचारणा केली. याचाच राग येऊन फिर्यादी व साक्षीदार यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडके व चॉपरने फिर्यादीच्या डोक्यात व साक्षीदाराच्या मांडीवर घाव घालून गंभीर दुखापत केली होती.

याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात  आरोपीतांविरुध्द भादवि कलम ३०७ सह  विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले होते. दरम्यान गुन्ह्यातील टोळी प्रमुख हैदर अली आसिफ अली हा आज पावेतो फरार होता. मात्र शहर पोलिसांना गुप्त माहितीनुसार गुन्ह्यातील टोळी प्रमुख नामे हैदर अली आसिफ अली हा त्याच्या राहते घरी आलेला असल्याची माहीती मिळाली. त्यावर पथकाने सापळा रचून त्याला घरून ताब्यात घेतले. तत्पूर्वी नमुद आरोपीताविरुध्द आज पावेतो शरीराविरुध्दचे ११, मालाविरुध्दचा १, महिला अत्याराविरुध्दचा १ असे एकुण १३ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यास २ वेळा हद्दपार व १ वेळा MPDA कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.

सदर कारवाई एम. राजकुमार पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक  रमेश चोपडे व  सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एक विशेष पथक तयार केले. व पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व पोलीस अंमलदार पोना महेंद्र पाटील, पोना भुषण पाटील, पोकॉ विजय पाटील, अमोल भोसले, पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, प्रकाश पाटील, पोहेकॉ विमल सानप अशांनी केली असून नमुद आरोपीताची पोलीस कस्टडी घेवुन सपोनि दिपक बिरारी व पोहेकॉ विनोद भोई, पोकॉ प्रकाश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Protected Content