फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना परखड सवाल

 

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  “मुख्यमंत्र्यांनी फक्त एवढं सांगावं, की बाहेर आलेल्या ऑडिओ क्लिप्स खऱ्या आहेत की खोट्या? यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलं ते खरं की खोटं? माध्यमांनी जे काही बाहेर काढलंय, ते खरं की खोटं? एवढं झाल्यावरही कोणाला संत ठरवायचंच असेल, तर जरूर त्यांनी ठरवावं. यातून तुमची नैतिकता काय आहे हे जनतेसमोर येतं”, अशी टीका आज देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात  केली

 

 

राज्यात सध्या चर्चा असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत. पूजा चव्हाणची आत्महत्या की हत्या, इथपासून ते संजय राठोड यांचा पूजा चव्हाणच्या मृत्यूमध्ये सहभाग होता का? इथपर्यंत आरोप होऊ लागले आहेत. विरोधी पक्षात असलेल्या भाजपानं यावरून रान उठवलेलं असताना अखेर रविवारी संजय राठोड यांनी वनमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिलं. चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन देखील दिलं. मात्र, त्यामुळे विरोधकांचं समाधान झालेलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रकार परिषदेवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तोंडसुख घेतलं आहे.

 

 

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आणि अधिवेशनात हा मुद्दा गाजणार हे स्पष्ट झालं. “पूजा चव्हाण प्रकरणावरून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांची जी केविलवाणी स्थिती झाली, ती होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. सर्व पुरावे असतानाही धडधडीत खोटं बोलत काही घडलंच नाही, असं दाखवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न पत्रकार परिषदेत मास्कमधून देखील दिसत होता”, असं फडणवीस यावेळी म्हणाले..

 

Protected Content