मुंबईः वृत्तसंस्था । लेखिका प्रियम गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या नाट्यावर लिहलेल्या पुस्तकावरून राजकीय वातारवरण तापल आहे. शरद पवारांचा भाजपला पाठिंबा होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फेटाळून लावला आहे
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली होती, स्थिर सरकार देण्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार होती. मात्र, शरद पवारांनी अचानक तेव्हा भूमिका बदलली. त्यानंतर अस्वस्थ झालेल्या अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि पहाटेचा शपथविधी झाला, असा दावा या ट्रेडिंग पॉवर पुस्तकात केला आहे. सत्तास्थापनेच्या घडामोडींचा विस्तृत वृतांत या पुस्तकात मांडला आहे. त्यानंतर खरंच राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपसोबत सरकार स्थापन करायचं होतं का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. या सर्व प्रश्नांवर नवाब मलिक यांनी खुलासा केला आहे.
नवाब मलिक यांनी या पुस्तकावर जोरदार टीका करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूनं लिहलं गेलं आहे. उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची शरद पवारांची भूमिका होती. ज्यांनी बेईमानीनं सरकार बनवलं त्यांची बाजू या पुस्तकात मांडण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या कृत्यामुळं प्रतिमा मलिन झाली आहे. ती स्वच्छ करण्यासाठीच हे पुस्तक लिहिलं आहे,’ असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.