प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणार घरपोच रक्कम

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बॅकांमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील पात्र लाभार्थी हे पैसे काढण्यासाठी एकत्र येऊन गर्दी करीत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पोस्ट ऑफिसने इंडीया पोस्ट पेमेंट बॅकेंच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांची रक्कम अदा करावी. असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.

कोरोना विषाणू ( कोव्हिड – 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक असल्याने याप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

जिल्ह्यातील सर्व बॅकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची गावनिहाय यादी जिल्हा अग्रणी बॅकेकडे त्वरीत सादर करावी. जिल्हा अग्रणी बॅकेंने सदरची यादी एकत्र करुन पोस्ट ऑफिसकडे जमा करावी. पोस्ट ऑफिसने इंडीया पोस्ट पेमेंट बॅकेंच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन सदरची रक्कम अदा करावी. याप्रमाणे लाभार्थ्यांना रक्कम देण्याची कार्यवाही पोस्ट ऑफिस तसेच नेहमीप्रमाणे बँकाव्दारेही करण्यात येईल.

याबाबतची कार्यवाही करीत असतांना या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, सुचना, निर्देश तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व सुचनांचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897 नुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी, जळगाव डॉ. ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content