नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।चालू आर्थिक वर्षात आणि नंतरही प्रचंड वाढणारी बेरोजगारी हेच सर्वांत मोठे जागतिक आव्हान राहणार आहे. कोरोना संसर्ग आव्हानही सोपे नसल्याचे स्पष्ट मत जागतिक आर्थिक परिषदेने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ) मांडले आहे.
चालू आर्थिक वर्षात व आगामी काळात जगासमोर बदललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे कोणती आव्हाने असणार आहेत, याचा अभ्यास जागतिक आर्थिक परिषदेने केला. त्यामध्ये तीस मोठे धोके असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आव्हानांची नोंद जगभरातील अर्थतज्ज्ञांनी तसेच उद्योगपतींनी केली आहे.
जागतिक आर्थिक परिषदेने २० ते २३ ऑक्टोबर या कालावधीत तीन दिवसांची जॉब्स रिसेट परिषद आयोजित केली आहे. त्याआधी ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्थायी स्वरूपाची अर्थव्यवस्था, समाज आणि कामकाजाची स्थिती निर्माण करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
जागतिक आर्थिक परिषदेने पूर्व आशिया व प्रशांत महासागर प्रदेश, युरेशिया, युरोप, लॅटिन अमेरिका व कॅरिबियन, आखात, उत्तर आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण आशिया तसेच सहारा प्रदेश या प्रदेशांतील स्थिती समजून घेतली. त्यासाठी १२७ देशांतील १२ हजारांहून अधिक उद्योगपतींना प्रश्न विचारण्यात आले. या अभ्यासात जागतिक आर्थिक परिषदेने म्हटल्यानुसार, बेरोजगारी आणि कोरोना आव्हानांपाठोपाठ वित्तीय संकट हे तिसऱ्या क्रमांकाचे मोठे संकट आहे.
या परिषदेने यंदा पर्यावरणामुळे आलेल्या आव्हानांचा आणि या आव्हानांमुळे निर्माण झालेल्या रोजगारविषयक बिकट परिस्थितीचाही मागोवा घेतला आहे. यंदा नैसर्गिक संकटे, हवामानातील फरकामुळे निर्माण झालेली परिस्थिती, परिवासाचा झालेला नाश, नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास, हवामान बदल सावरण्यासाठी ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्यात आलेले अपयश हे धोके विचारात घेण्यात आले आहेत. नैसर्गिक धोक्यांसमवेत मानवनिर्मित आव्हानेही चिंताजनक असल्याचे परिषदेने म्हटले आहे. कंपन्यांतून मोठ्या प्रमाणावर केले जाणारे स्वयंचलन किंवा ऑटोमेशन, श्रमिकांचे भवितव्य धोक्यात असणे, या बाबींचाही या अभ्यासात समावेष आहे .