पैसे मागण्याच्या कारणावरून तरूणाला दोघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निमखेडी शिवारात असलेल्या पटेल नगर येथे पैसे देणे घेण्याच्या वादातून एका तरुणाला दोन जणांनी डोक्यात लोखंडी रॉड व कुलूप मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात गुरुवार ३० मार्च रोजी दुपारी १ वाजता दोन जणांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णवर्धन राजेंद्र पाटील (वय-२२) रा. पटेल नगर, निमखेडी शिवार, जळगाव हा तरुण मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे. दरम्यान त्याच परिसरात राहणारे राजेंद्र नामदेव सोनवणे आणि दिनेश राजेंद्र सोनवणे यांनी बुधवार २९ मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास कृष्णवर्धन यांच्याकडे ५० हजार रुपये मागितले. त्यावर कृष्णवर्धन पाटील म्हणाले की, पैशांबाबत सकाळी बोलू असे सांगितले. याचा राग आल्याने दोघांनी कृष्णवर्धन पाटील यांच्या डोक्यात कुलूप व लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केली. जखमीअवस्थेत कृष्णवर्धन पाटील यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान गुरुवार ३० मार्च रोजी दुपारी १ वाजता कृष्णवर्धन पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेंद्र नामदेव सोनवणे, दिनेश राजेंद्र सोनवणे दोन्ही रा. पटेलनगर, निमखेडी शिवार, जळगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.

Protected Content