पेट्रोल-डिझेटची दरवाढ सुरूच; दहा दिवसात पेट्रोल साडेचार रूपयांनी महागले

मुंबई वृत्तसंस्था । देशभरात सलग दहा दिवस इंधन दरवाढ सुरुच असल्याने वाहनचालक पुरते त्रस्त झाले आहेत. आधीच ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खिसा गरम झाला असताना पेट्रोल-डिझेलचे दर भडकत असल्याने सर्वसामान्य नागरिक कात्रीत सापडले आहेत. गेल्या दहा दिवसात पेट्रोल तब्बल साडेचार रुपयांनी महाग झाले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी ७ जूनपासून सुरु झालेली इंधन दरवाढ थांबायचं नाव घेत नाहीये. पेट्रोल आजच्या दिवसात प्रतिलिटर ४७ पैसे, तर डिझेल ५७ पैशांनी महाग झाले आहे. गेल्या दहा दिवसात पेट्रोल एकूण ४ रुपये ५० पैशांनी, तर डिझेल एकूण ५ रुपये ६६ पैशांनी महागले आहे.

लॉकडाऊनच्या काळात इंधनाच्या विक्रीत प्रचंड घट झाली होती. त्यामुळे १६ मार्च ते ५ मे या कालावधीत देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर होते. या काळात कच्च्या तेलाच्या किमती मात्र वाढत होत्या. हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे.

Protected Content