पॅरोलवर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराचा जेलरक्षकावर जीवघेणा हल्ला

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कारागृहात असतांना जुन्या वादातून पॅरोलवर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराने जेलरक्षकावर चॉपरचा धाक दाखवत मारहाण केल्याची घटना रात्री ९ वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहाच्या आवारात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, कुलदिपक सुंदर दराडे (वय-२६) रा. शासकीय निवासस्थान हे जिल्हा कारागृहात जेलरक्षक म्हणून नोकरीत आहे. त्यांची रात्री पाळी असल्याने ३ जून रोजी सायंकाळी ६ ते ४ जून सकाळी ६ पर्यंत ड्यूटी होती. दरम्यान, रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास पहारा संपल्यानंतर जेवणाचा डबा देण्यासाठी मेन गेटमधून बाहेर आले. त्याचवेळी जेलमधील पॅरोलवर सुटलेला आरोपी राज वसंत चव्हाण रा. प्रताप हॉस्पिटल जवळ मारवड रोड हा उभा होता. जेलरक्षक कुलदिपक मेन गेटच्या बाहेर येताच सराईत गुन्हेगार राज चव्हाण हा जवळ येवून ‘पुर्वीच्या ड्यूटीवर काळातील चांगली सुविधा दिली नाही, मी तुला मारून टाकेन’ असे बोलून चापटा बुक्क्यांनी गालावर, छातीवर मारहाण करून जवळील चॉपर काढून कुलदिपक यांना चॉपरचा धाक दाखवत जीवेठार मारण्याची धमकी दिली. यावेळी कुलदिपक यांनी आरोडाओरड केल्याने बाजुच्या निवासस्थानातील जेल कर्मारी रोशन लहू गिरी, अरविंद जोजाबराव म्हस्के, राहुल राम बोडके यांनी धाव घेतली. सर्वजण धावून येत असल्याचे पाहून आरोपी राज चव्हाण हा घटनास्थळाहून पळ काढला. कुलदिपक दराडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आरोपी राज चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र सुरवाडे करीत आहे.

राज हा सराईत गुन्हेगार

अट्टल घरफोड्या पिस्तूलाचा धाक दाखवून धुमाकूळ घालणारा राज वसंत चव्हाण याला पकडण्यासाठी चाळीसगांव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी सूचना केल्या होत्या. अमळनेर शहरातील हॉटेल रुपालीचे मालक यांच्यावर प्राणघातक हल्ला, पालिकेच्या समोर पानटपरी चालकाची लूट व रेल्वे स्थानकावर धुमाकूळ घालणे शेगांव येथील एटीएम जवळील खून प्रकरण तसेच अरुण पुंडलिक पाटील यांच्या घरातून केलेली लूट अश्या विविध गुन्ह्यात सभाग आहे. आरोपी राज यास तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने राजला पिस्तूलासह मे २०१८ मध्ये जेरबंद केले होते.

Protected Content