गॅस एजन्सीच्या आमिषातून प्राध्यापकाची फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । गॅस एजन्सी मिळवून देण्याच्या आमिषाने एका प्राध्यापकाची तब्बल साडेनऊ लाख रूपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक केल्या प्रकरणी सायबर क्राईम शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, प्रा. दिलीप हरसिंग राठोड (वय ४८, रा. पारोळा) यांना भारत गॅसची एजन्सी घ्यायची होती. यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला होता. दरम्यान, त्यांनी या अर्जात संपूर्ण माहिती, मोबाइल नंबरही दिला होता. यानंतर अशोक चक्रवर्ती आणि रवी कुमार या दोघांनी वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून राठोड यांना फोन करून आपण भारत गॅसच्या मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचे राठोड यांना भासवले. भारत सरकारची राजमुद्रा असलेले व राजमुद्रेवर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा शिक्का मारून बनावट कागदपत्रे तयार केली.
ही बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवून त्यावर पुन्हा भारत गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडचा लोगो व नाव तयार करून बनावट ई-मेल आयडीवरून दिलीप राठोड यांच्या ई-मेल आयडीवर पाठवले.

यानंतर या दोघांनी राठोड यांच्याकडून पैसे मागितले. ३० डिसेंबर २०२० ते १४ जानेवारी २०२१ या कालवधीत त्यांनी राठोड यांच्याकडून आरटीजीएस पद्धतीने नऊ लाख ५० हजार रुपये मागवून घेतले. यानंतर त्या दोन्ही जणांनी त्यांना संपर्क केला नाही. परिणामी, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर राठोड यांनी सायबर पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत.

Protected Content