शिलाँग : वृत्तसंस्था । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध गोष्टी निर्जंतूक करण्यासाठी अनेक उत्पादने बाजारात आली आहेत. काही यंत्रेही निर्जंतुकीकरणाचे काम अधिक सोपे करत आहेत. ग्रंथालयांसारख्या ठिकाणी वाचनाचे साहित्य निर्जंतूक करण्याची गरजही निर्माण झाली. पुस्तकांद्वारे कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नॉर्थ-इस्टर्न हिल विद्यापीठाने पुस्तके निर्जंतूक करण्याच्या यंत्राचा शोध लावला आहे.
एनईएचयूच्या बायोमेडिकल इंजिनीअरिंग आणि बेसिक सायन्स व सोशल सायन्स विभागाच्या नवनिर्मिती करणाऱ्या टीमने हे यंत्र विकसित केले. ‘हे यंत्र स्वयंचलित असून याद्वारे कोणत्याही प्रकारचे वाचनाचे साहित्य निर्जंतूक करता येईल. ,’ असे डॉ. असीम सिन्हा यांनी सांगितले. हे यंत्र पुस्तकांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी अतिनील किरणे आणि उष्णता तंत्रज्ञानाचा वापर करते. ते एका चक्रात १५० पुस्तके २० पैसे प्रति पुस्तक या किंमतीत निर्जंतूक करू शकते. यासाठी ४५ मिनिटांचा कालावधी लागतो, असेही सिन्हा यांनी सांगितले.
एनईएचयूचे कुलगुरू प्रा. एस. के. श्रीवास्तव यांच्या हस्ते विद्यापीठाच्या ग्रंथालयात या यंत्राचे उद्घाटन करण्यात आले. ‘ज्ञान देणारे ठिकाण म्हणजे ग्रंथालय आणि सामाजिक फायद्यासाठी ज्ञानाचे साधनांमध्ये रुपांतर करण्याचे ठिकाण म्हणजे तंत्रशाळा याचे हे यंत्र उत्तम मिश्रण आहे,’ असे प्रा. श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना यंत्राच्या वापराबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे .
ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल डॉ. एफ. आर. सुमेर म्हणाले की, ‘विशेषत: लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर दोन महिन्यांपासून विद्यार्थी आणि अन्य वाचकांना पुस्तके आणि इतर वाचन साहित्य देताना त्यांच्या योग्य हाताळणीसाठी अशा यंत्राची गरज वाटत होती. विद्यापीठाच्या ग्रंथालयात कोरोनामुक्त वातावरण ठेवण्याचा उद्देश या यंत्राच्या निर्मितीमागे आहे.’