पातोंडा येथे आर्थिक लोभातून झाडांची कत्तल ; सामाजिक कार्यकर्ते बिरारी यांचा आरोप

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारत परिसरात जिवंत झाडांची कत्तल करून लाकूड नेणाऱ्या वाहनांवर वन-विभागाने कार्यवाही केल्याची घटना गुरुवार रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. हि झाडांची कत्तल पैशाच्या लोभातून करण्यात आली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बिरारी यांनी केला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बाजारपेठ परिसरात काही झाडांच्या फांद्या ह्या विदुयत तारांना स्पर्श करत होत्या. पावसाचे दिवस असल्याने पुढे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही व्यावसायिकांच्या मागणीनुसार ग्राम पंचायतीने बाहेरील लाकूड तोडणाऱ्या व्यक्तींकडून झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू केले होते.  त्यांनतर काही जीर्ण झाडे देखील तोडण्यात आली. गुरुवार दि.१ सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या परिसरात जिवंत झाडांची कत्तल होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रविण बिरारी यांनी विभागीय वन अधिकारी यांना दूरध्वनीद्वारे केली. विभागीय वन अधिकारी यांच्या आदेशानुसार वन कर्मचारी सोनवणे व असुले यांनी घटनास्थळी धाव घेत लाकडाने भरलेले वाहन क्र. MH-04 DD.109 ताब्यात घेत पुढील कार्यवाहीकरिता नेले.

तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार मागील काही दिवसांपासून वीज तारांना स्पर्श होणाऱ्या झाडांच्या फांद्या व काही जिवंत झाडे ह्या वन विभागाकडून कोणतीही पूर्व परवानगी न घेता परस्पर अवैधरित्या कत्तल केली जात होती  व लाकूड व्यापाऱ्यांना विक्री केले जात होते.  यामागे आर्थिक लोभ असल्याचा त्यांचा आरोप आहे. याबाबत सरपंच भरत बिरारी यांच्याशी संपर्क साधला असता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून मुख्य प्रवेशद्वाराचे काम सद्या सुरू आहे. त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वापरास सदर झाड हे आडकाठी ठरत होते त्यामुळे हा प्रकार झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहितीकरीता विभागीय वन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आता ह्या तक्रारीकडे वन विभागाकडून काय कार्यवाही होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

 

सामाजिक कार्यकर्ते प्रविण बिरारी यांनी सांगितले की, गावात वीज तारांना स्पर्श होणाऱ्या झाडांच्या फांद्याआड वन विभागाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अवैधरित्या जिवंत झाडांची कत्तल केली जात आहे. गावात एकीकडे वृक्ष-लागवड,जतन,संवर्धन यासाठी शासन लाखो रुपयांचा खर्च करत असून गावात अशाप्रकारे वृक्षतोड होत आहे.यासंबंधी प्रधान मुख्य वनसंरक्षक,जिल्हा व विभागीय वन अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करणार असून वृक्षतोडीची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहे.

 

सरपंच भरत बिरारी यांनी हे आरोप फेटाळून लावत सांगितले की, गावात विज तारांना स्पर्श होणाऱ्या फांद्या ह्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार तोडण्यात आल्या. नवीन दवाखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला अडसर ठरणारे झाड हे तोडणे आवश्यक होते.यात आर्थिक लोभाचा कुठलाच संबंध नसून झालेल्या कार्यवाही वर त्यासंबंधी आम्ही जि.प.बांधकाम विभागाकडून आवश्यक ती कागदपत्रे वन विभागाला सादर केली असून संबंधिताने केलेल्या तक्रारीत काहीच तथ्य नसून केलेला आरोप बिनबुडाचा आहे.

 

Protected Content