बंद घर फोडून रोकड व दागिन्यांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना शनिवारी ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता शिवकॉलनी परिसरात उघडकीस आली. याठिकाणाहून चोरट्यांनी २६ हजारांचा ऐवज लंपास केला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील शिवकॉलनी परिसरात सुनंदा गिरीश झोपे या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. याच परिसरात एक भाड्याने घर घेतले असून त्याठिकाणी वास्तव्यास आहे. तसेच स्वत:च्या घराचा देखील ते वापर करीत असतात. शुक्रवारी ७ जुलै रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून ते भाडेतत्वावर घेतलेल्या घरात गेले. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातून पाच हजार रुपयांची रोकडसह सोने चांदीचे दागिने असा एकूण २६ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवून नेला. शनिवारी ८ जुलै रोजी सकाळच्या सुमारास सुनंदा झोपे या घरी गेल्या असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर दुपारच्या सुमारास सुनंदा झोपे यांनी रामानंद नगर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content