पाणी पुरवठा अपहार प्रकरणी समिती अध्यक्ष व सचिवाला शिक्षा

जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील नांद्र प्र. येथील पाणी पुरवठा योजनेतील अपहार प्रकरणी पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिव या दोघांना आज शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याबाबत वृत्तांत असा की, जामनेर तालुक्यातील नांद्रा प्रगणे येथील पाणी पुरवठा योजनेत ८ लाख ६६ हजार १४५ रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष बाबुराव पुंडलिक पाटील, व सचिव कांतीलाल दौलत पाटील यांना दोषी धरत प्रत्येकी १ वर्ष सक्तमजुरीसह कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यातील ठेकेदाराला दोषमुक्त करण्यात आले आहे. मंगळवारी मुख्य न्यायदंडाधिकारी न्या. सी.व्ही.पाटील यांनी हा निकाल दिला..

नांद्रा प्रगणे येथे २००३ या वर्षाकरीता गावात पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्रशासनाने ४८ लाख ८ हजार रुपयांची तरतूद केली होती. नांद्रा प्रगणे व लोहारा या पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष बाबुराव पुंडलिक पाटील व सचिव कांतीलाल दौलत पाटील यांच्या नावाने संयुक्त खाते असून या खात्यात तरतुदीच्या पहिल्या रकमेपैकी पहिला हप्ता ८ लाख ६६ हजार रुपये तसेच लोकवर्गणीतून ४ लाख १० हजार रुपये असे एकूण १२ लाख २२ हजार पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या खात्यात जमा झाले होते.

पाणीपुरवठा योजनांच्या कामांबाबत निविदा प्रसिध्द करुन ठेकेदार विजय गोपीचंद पाटील यांना ठेका देण्यात आला होता. त्यासाठी खात्यात जमा रकमेपैकी समिती अध्यक्ष व सचिव यांनी १२ लाख १७ हजार रक्कम काढले. मात्र चार विहिरींचे खोदकाम झाल्यावर काम थांबले. काम बंद झाल्याने याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार शाखा अभियंता श्री पद्मे यांनी कामाचे मुल्यांकन केले असता प्रत्यक्षात ३ लाख ९१ हजार रुपयांचे काम झाल्याचे समोर आले. यानंतर जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राजेंद्र शंकर पंडोरे यांच्या फिर्यादीवरुन समितीची अध्यक्ष व सचिव तसेच ठेकेदार यांच्याविरोधात ८ लाख ६६ हजार १४५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात भादवि कलम ४०९, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांनी चौकशीअंती दोषारोपपत्र दाखल केले. मुख्य न्यायदंडाधिकारी न्या.सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात सरकारपक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी व पुराव्यावरुन समिती अध्यक्ष बाबुराव पुंडलिक पाटील, सचिव कांतीलाल दौलत पाटील यांना दोषी धरण्यात येवून दोघांना प्रत्येकी एक वर्ष सक्तमुजरीसह कारावास व २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. तर ठेकेदार विजय पाटील यांना दोषमुक्त करण्यात आले. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. आर.पी.गावीत यांनी काम पाहिले. तर खटल्याकामी पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक शंकर सपकाळे यांनी काम पाहिले.

Add Comment

Protected Content