गर्भवती अविवाहित महिलेला २४ व्या आठवड्यात गर्भपाताला परवानगी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महिला अविवाहित आहे म्हणून तिला गर्भपाताला परवानगी नाकारू शकत नाही. तिलाही गर्भपाताचा कायदेशीर हक्क आहे, असे महत्त्वपूर्ण मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने गर्भधारणेनंतरच्या २४ व्या आठवडयात गर्भपात करण्यास अविवाहित महिलेला परवानगी दिली आहे.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये गरोदर राहिलेल्या महिलेने २४ व्या आठवडयात गर्भपात करण्यास परवानगी मागत सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे परवानगी नाकारली गेली. त्यामुळे तिने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.

तिच्या अपिलावर गुरुवारी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने अविवाहित महिलेच्या हक्कांवर बोट ठेवत याचिकाकर्त्या महिलेच्या बाजूने अंतरिम आदेश दिला. महिलेचे लग्न झालेले नाही, या एकमेव कारणावरून महिलेला गर्भपात करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असे खंडपीठ म्हणाले. याचवेळी तिला गर्भधारणेनंतरच्या २४ व्या आठवडयात गर्भपात करण्यास परवानगी दिली.

Protected Content