पाचोऱ्यात ‘लंम्पी स्किन डिसीज’ आजाराला हटविण्यासाठी प्रशासन सज्ज

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यात लंम्पी स्किन डिसीज आजाराचा शिरकाव होऊ नये, या अनुषंगाने खबरदारी म्हणून पशुधन विभागाने कंबर कसली आहे. तालुक्यातील अनेक गावात लसीकरण व जनावरांचे गोठे फवारणीची मोहीम हाती घेतली आहे. आजपर्यंत सुमारे साडे तीन हजार गुरांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक महाजन यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

लसीकरण व फवारणीसाठी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत निधीतून दहा हजार रुपये खर्च करावयाचे असल्याने ज्या ग्रामपंचायतीने दहा हजार रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली आहे. अशा गावात जाऊन पशुधन विभागाने लसीकरण करणे सुरू केले आहे. जो पर्यंत संपूर्ण जिल्ह्यातून लंम्पी आजार हद्दपार होत नाही तोपर्यंत ही मोहीम तालुका भरातही सुरुच राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

जळगांव जिल्ह्यातील रावेर, यावल, भुसावळ, सावदा, खिरोदा, फैजपूर या ठिकाणी लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे जिल्ह्यात आता पर्यंत या आजारामुळे १० ते १२ गुरे दगावल्याची माहिती समोर आल्याने राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी नुकताच जिल्ह्यातील लंम्पी आजाराच्या बाधीत भागाचा दौरा केला होता.

या आजाराबाबत सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याने पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला असून पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक डॉ. शामकांत पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. व्ही. सिसोदे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तालुक्यात पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक महाजन, डॉ. सुजाता सावंत, डॉ. निलेश बारी, डॉ. रविंद्र टेम्पे, डॉ. एस. व्ही. मडावी, डॉ. वानखेडे, बाळू पाटील यांचे टिमने लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे.

पाचोरा तालुक्यातील वाणेगाव – ७००, लोहारी – ७००, पिंपळगाव (हरे.) – ७००, निपाणे – २००, बांबरुड (राणीचे) – ७००, खडकदेवळा – २००, वरखेडी येथील गोशाळा – १५० जनावरांचे लसीकरण पुर्ण केले आहे. व यापुढेही लसीकरण सुरुच राहणार आहे. गावकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या आरोग्यासाठी लसीकरण करुन घ्यावे व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन पशुधन विभागाने केले आहे.

Protected Content