मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा नजमा तडवी अपात्र

मुक्ताईनगर प्रतिनिधी | जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी येथील नगराध्यक्षा नजमा तडवी यांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरविले आहे. ऐन निवडणुकीच्या आधी नगराध्यक्षांना अपात्र करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नजमा तडवी यांनी भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. हे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने नियमानुसार त्यांनी सहा महिन्यांच्या आत आणि सुधारित निर्देशानुसार एक वर्षाच्या आत आपले जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र तब्बल पाच वर्षे उलटण्याच्या मार्गावर असतांना देखील त्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते.

या पार्श्‍वभूमिवर, गिरीश रमेश चौधरी यांनी जळगावच्या जिल्हाधिकार्‍यांकडे नजमा तडवी यांना अपात्र करण्यात यावे अशा मागणीचे अपील सादर केले होते. यावर सुनावणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नजमा तडवी यांना अपात्र ठरविले आहे. येत्या दोन-तीन महिन्यात मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक होणार असतांना ही अपात्रतेची कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Protected Content