पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा तालूका भूमी अभिलेख कार्यालयाची धुरा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांकडे पाचोरा व चाळीसगाव येथील अतिरिक्त भार देण्यात आल्याने याचा विपरीत परिणाम होऊन नागरिकांची छोटी छोटी कामे देखील विलंबाने होत आहे.
येथील शहर भूमापक पी. व्ही. कुलकर्णी यांचेकडे वारंवार पाठपुरावा करून देखील आलेल्या नागरिकांची कामे आर्थिक तडजोडी शिवाय होत नसल्याच्या तक्रारी काही नागरिक करीत आहेत. नागरिकांना किरकोळ कारणांसाठी सतत कार्यलयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने त्यांच्यात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. वरिष्ठांनी या कार्यलयाच्या कामकाजात सुसूत्रता आणत पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी केली जात आहे. या कार्यालयातील अनेक कर्मचारी बाहेर गावाहून उपडाऊन करत असल्याने देखील त्यांना अनेकदा कार्यालयीन वेळेत पोहचणे शक्य होत नाही. तसेच संध्याकाळी घरी जाण्याच्या घाईमूळे जनतेची दैनंदिन कामे बाधित होत असल्याचे चित्र आहे. यातच शहर भूमापक व उपअधीक्षक हे आपली जबाबदारी एकदुसऱ्यावर टाकत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उपअधीक्षक भगवान भोये यांच्या उर्मटपणामुळे देखील अनेक वेंडर बांधवांसह नागरिक त्रस्त आहेत. उपअधीक्षक भगवान भोये यांच्या विषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. यात प्रामुख्याने कोणाचेही फोन न उचलणे, पाचोऱ्या सारख्या मोठे कार्यक्षेत्र असलेल्या तालुक्याला अधिकाऱ्याने आठवड्यातून केवळ एकच दिवस वेळ देणे यांचा समावेश आहे. यापूर्वी देखील अशाच अनेक तक्रारींमुळे शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर यांनी कार्यालयाला कुलूप ठोकत आंदोलन केले होते. तर काही वर्षापूर्वी काम होत नसल्याने अनोख्या पद्धतीने अर्धनग्न आंदोलन करत खळबळ निर्माण केली होती. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोक प्रतिनिधींनी या प्रकरणी लक्ष घालत कामकाजात सुसूत्रता आणत याठिकाणी होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालावा अशी मागणी होत आहे.