पाचोरा-भडगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खरीप हंगामात शेतकऱ्यांनी लागवड केलेले पीक कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी इ. पिकांची परिस्थिती पावसाचा खंड पडल्याने अतिशय वाईट झाली आहे. पाचोरा व भडगाव तालुक्यात सरासरी प्रजन्यमान फार कमी असल्याने पिकांची वाढ खुंटलेली आहे. परिणामी बळीराजा संकटात सापडलेला आहे. तसेच पाचोरा – भडगाव तालुक्यात मागील २५ दिवसापासून पावसाचा खंड पडल्याने पूर्णपणे पीक वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. तरी शासनाने पाचोरा व भडगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. अशा मागणीच्या आशयाचे निवेदन आज भाजपाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तालुकाध्यक्ष व पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे यांना दिले आहे.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रदिप पाटील, शहर अध्यक्ष रमेश वाणी, पंचायत समितीचे मा. सभापती बन्सीलाल पाटील, सोमनाथ पाटील, ओ. बी. सी. आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील, शहर सरचिटणीस दिपक माने, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष लकी पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष समाधान मुळे, प्रज्ञावंतचे तालुका अध्यक्ष सुनिल पाटील, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष विरेंद्र चौधरी, योगेश ठाकुर, संदिप पाटील, विजय महाजन, जगदिश पाटील, शुभम पाटील, आकाश लांडगे, कुणाल मोरे, भागवत कोळी यांचेसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

याबाबत अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले की, पिक विम्याची माहिती घेतली असता भडगाव तालुक्यातील साधारण २५ हजार शेतकऱ्यांनी व पाचोरा तालुक्यातील साधारण ४४ हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सर्वसमावेशक पिक विमा योजना मधुन विमा उतरवलेला आहे. पिक विम्याच्या शासन निर्णयानुसार सलग २१ दिवस पावसाचा खंड (२.५ मि. मी. पेक्षा कमी पाऊस) पडल्यास शेतकऱ्यांना पिक विम्याची २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई देय आहे. सदरील पावसाची नोंद ही महसूल मंडळांमध्ये लावलेले स्वयंचलित हवामान यंत्रात होत असते व सदरचा डाटा हा महावेध या ठिकाणी नोंदणी होत असतो. याबाबत महावेध पावसाचा अहवाल मागविला असता पाचोरा तालुक्यातील वरखेडी महसूल मंडळातच पावसाचा खंड पडल्याची नोंद झालेली असून उर्वरित सर्व महसूल मंडळे व भडगाव तालुक्यात सर्व महसूल मंडळात पावसाचे नोंदणी बाबत शंका निर्माण झाली आहे. परंतु इतर मंडळात देखील पिकांची परिस्थिती सारखीच असल्याने त्या भागात देखील नुकसान भरपाई देण्यात यावी. याबाबत सदरील महसूल मंडळांमध्ये बसविलेले स्वयंचलित हवामान केंद्र यामध्ये कमी व जास्त तापमान वादळी वारे व पावसाची नोंद होते हे निकषा प्रमाणे न बसवता चुकीच्या ठिकाणी बसवलेली असून या ठिकाणी कुठल्याही नोंदी व्यवस्थित होत नसून पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी हे नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

याकरिता मागील कालावधीत वेळोवेळी मा. जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि प्रशासन यांना निवेदन देऊन देखील सदरील हवामान केंद्राची कुठलीही देखभाल दुरुस्ती व पाहणी करण्यात आलेली नसुन यामुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान होण्याची शक्यता असुन याकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत आहे. असा आरोप अमोल शिंदे यांनी बोलतांना केला. तसेच तालुक्याचे आमदार शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून पाचोरा – भडगाव मधील सोयाबीन उत्पादक शेतकरी पिक विमा पासून वंचित राहिले यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आली तरी देखील त्यावर आमदारांकडून कुठलाही मार्ग निघाला नाही. तसेच भडगाव तालुक्यातील २०१९ मध्ये झालेल्या वादळीवारा व गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यासाठी देखील भडगाव तालुक्यातील विविध शेतकरी संघटना व भारतीय जनता पार्टी यांनी निवेदने दिले. तरी आज पावेतो आमदारांनी हा प्रश्न मार्गी लावलेला नाही.

पाचोरा – भडगाव तालुक्यात पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडलेला असतांना विहिरीतील पाणी पिकांना देण्यासाठी शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा देखील सुरळीत पद्धतीने होत नाहीये. मागील चार वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या अशा अनेक समस्या आहेत.त्यापैकी आमदार महोदयांनी कुठलीच समस्या मार्गी लावलेली नाही.आमदार साहेब फक्त मोठमोठ्या वल्गना करतात आणि सोईस्करपणे शेतकऱ्यांची दिशाभूल करतात असा घणाघात यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष व पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुखअमोल शिंदे यांनी केला.

Protected Content