पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा शांततेचा सूर !

 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीर मुद्यावर भारत-पाकिस्तानने शांततामय मार्गाने तोडगा काढावा, असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कामर जावेद बाजवा यांनी म्हटले आहे.

खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील रिसालपूर येथील पाकिस्तान एअर फोर्सच्या पदवी प्रदान कार्यक्रमात बोलताना जनरल बाजवा यांनी जम्मू-काश्मीर संबंधी हे विधान केले.

“जम्मू-काश्मीर हा भारत-पाकिस्तानमधील पूर्वीपासून चालत आलेला मुद्दा आहे. दोन्ही देशांनी जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या इच्छा-आकांक्षा लक्षात घेऊन सम्मानजनक आणि शांततामय मार्गाने यावर तोडगा काढावा” असे जनरल बाजवा यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरच्या मुद्दावर पाकिस्तान तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपासाठी प्रयत्नशील होते. पण आता भारत-पाकिस्तानने शांततामय मार्गाने तोडगा काढावा हे बाजवा यांचे विधान अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरते. “परस्परांचा आदर आणि शांततेने एकत्र राहणे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शांततेसाठी सर्व दिशांना हात पुढे करण्याची ही वेळ आहे” असे बाजवा म्हणाले.

जनरल बाजवा यांच्या विधानावरुन काश्मीर मुद्यावर नेहमी आक्रमकतेची भाषा करणा करणाऱ्या पाकिस्तानचा सूर थोडा नरमल्याचे दिसत आहे. २०१९ साली ऑगस्ट महिन्यात भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले, तेव्हापासून पाकिस्तान भारताविरोधात गरळ ओकत आहे. अमेरिकेने काश्मीर मुद्यावर हस्तक्षेप करावा, यासाठी इम्रान खान सरकारचे प्रयत्न सुरु होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी हस्तक्षेपाची तयारी सुद्धा दाखवली होती.

Protected Content