रेल्वेच्या धक्क्याने जखमी झालेल्या गर्भवती गायीचे वाचविले प्राण; जळगावात तरूणांची माणुसकी

जळगाव प्रतिनिधी । रेल्वे रूळावर जखमी पडलेल्या गर्भवती गायीला  शहरातील तरूणांनी क्रेनच्या मदतीने बाहेर काढून तिचे प्राण वाचविल्याची घटना पिंप्राळा रेल्वे गेटजवळील नवसाला पावणारा गणपती मंदीरासमोर घडली. तरूणांच्या मदतीमुळे गायी प्राण वाचले असून तिला बाफना गोशाळेत उपचारासाठी  रवाना केले आहे. 

शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळील नवसाला पावणारा गणपती मंदीरासमोर आलेल्या रेल्वे रूळावरून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एक गर्भवती गाय रेल्वे रूळ ओलांडून जात होती. त्याचवेळी भरधाव रेल्वेच्या धक्का गायीला बसला. यात गायीचा कंबरेचा भाग जखमी होवून रक्तस्त्राव होत होता. 

दरम्यान, गाय  जखमी झाल्याची माहिती शहरातील पत्रकार कमलेश देवरे व त्यांचे सहकारी यांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरूवातीला  रेल्वेवाहतूकीला अडथळा होवू नये म्हणून जखमी गायीला तरूणांनी मिळून बाजूला केले. रेल्वेच्या फटक्यामुळे गर्भवती गायीच्या कंबरेच्या भागाला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला निट उभे राहताही येत नव्हते. 

तरूणांनी गायीला महापालिकेच्या ट्रक्टरमधून नेण्याची विनंती करूनही कर्मचाऱ्यांनी नेण्यास नकार दिला. राजकीय क्षेत्रातूनही मदतीचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पत्रकार कमलेश देवरे यांनी स्वत:च्या मालकीचे ट्रक्टर घटनास्थळी मागवून घेतले. माजी उपमहापौर आश्विन सोनवणे यांच्या सहकार्याने २० फुटी क्रेन मागविण्यात आले. सुरूवातीला पशूवैद्यकिय अधिकाऱ्यांना बोलावून जखमी गायीवर उपचार केले व रक्तस्त्राव थांबविला. त्यानंतर  क्रेनच्या मदतीने तिला ट्रॅक्टरमध्ये टाकण्यात आले. ही सगळी धडपड  रात्री १० पर्यंत सुरू होती  जखमी गायीस रात्री ११ वाजेच्या सुमारास बाफना गोशाळेत नेण्यात आले असून उपचार सुरू आहे. दरम्यान गर्भवती गाय तीन वासरांना जन्म देणार असल्याची माहिती तेथील जनावरांनी दिली . 

माजी उपमहापौर तथा नगरसेवक अश्विन सोनवणे, पत्रकार कमलेश देवरे, निलेश तायडे, प्रवीण कोळी, उदय पाटील, अनिल देशमुख, विक्की पाटील, भैय्या पाटील, मोरसिंग राठोड, हर्षल कोल्हे, डॉ. शुभम गायकवाड यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी हे मदत कार्य केले.

Protected Content