पाकिस्तानात निवडणुकीत लष्कराने गैरप्रकार केल्याचा आरोप

 

कराची: वृत्तसंस्था । पाकिस्तानात २०१८मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत लष्कराने गैरप्रकार केल्याचा आरोप पाकिस्तानातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी केला आहे. विरोधकांच्या आरोपावर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी उत्तर दिले असून लष्कराने केलेली कारवाई राष्ट्रहिताची असल्याचे म्हटले.

या निवडणुकीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्ष विजयी होऊन सत्तेवर आला होता. पाकिस्तानमध्ये २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लष्कराने हस्तक्षेप केल्याचे स्पष्ट असले तरी थेट आरोप कोणत्याही पक्षाने केला नव्हता. मात्र, शनिवारी पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) या दोन पक्षांनी थेट लष्करावर आरोप केले आहेत.

इम्रान खान यांना सत्तेवरून हटविण्यासाठी विरोधकांनी आघाडीची स्थापना केली असून, त्याच्या बैठकीत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी लंडनहून भाग घेतला. इम्रान खान यांना पंतप्रधान करण्यासाठी लष्कराने निवडणुकीत हस्तक्षेप करणे हा देशाच्या घटनेनुसार देशद्रोह आहे, असे ते म्हणाले. इम्रान खान यांनी हा आरोप फेटाळला आहे.

नवाझ शरीफ यांनी म्हटले की, लष्कराच्या गणवेशात सहभाग घेऊन राजकीय हस्तक्षेप करणे हे संविधानविरोधी आणि देशद्रोही कृत्य आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनीदेखील लष्करावर २०१८ च्या निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप केला आहे.

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप झाल्यास त्यांचा पक्ष इस्लामाबादमध्ये घेराव आणि धरणे आंदोलनासह इतर तीव्र आंदोलन करणार आहे. आयएसआय आणि पाकिस्तान लष्कराचा सातत्याने अपमान करून शरीफ आगीशी खेळत असल्याचे इम्रान म्हणाले . नवाझ शरीफ हे पाकिस्तानचे तीन वेळेस पंतप्रधान होते. मात्र, त्यांना एकदाही आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी म्हटले की, लष्कराने निवडणुकीत बजावलेली भूमिका ही संविधानाने निश्चित केलेली जबाबदारी आणि देशहितात होती. पाकिस्तान सैन्य अकादमी काकूलमध्ये जवानांच्या पासिंग परेडला संबोधित करताना त्यांनी आरोपांना उत्तर दिले. पाकिस्तान लष्कराकडून सरकारला पाठिंबा देणे सुरूच राहणार असून लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणारे असल्याचे त्यांनी म्हटले.

Protected Content