दानवेंनी केले राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याचे समर्थन : विरोधक आक्रमक

औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाने निर्माण झालेला वाद मिटत नाही तोच आता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याने खळबळ उडाली आहे.

 

काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादच्या दौर्‍यावर असतांना ”समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचं स्थान काय असतं ?”असं विधान केल्याने खळबळ उडाली असून राज्यभरात त्यांच्या वक्तव्याचा निषेध होत आहे. याच पाठोपाठ केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामीच होतो, असं म्हटलं आहे. ”शाळेत शिकविल्याप्रमाणे तसंच आमच्या माहितीप्रमाणे समर्थ रामदासच शिवरायांचे गुरु होते”, असं विधान करत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यपालांच्या विधानाचं समर्थन केल्याने त्यांना देखील विरोध सुरू झाला आहे.

या संदर्भात औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, आमच्या माहितीप्रमाणे समर्थ रामदासच शिवरायांचे गुरु होते. जेवढं आम्ही शिकलो, जेवढं आम्ही वाचलं, जेवढं आम्ही ऐकलं त्याचा आधार घेऊन बोलतोय. आमच्यापेक्षा अधिक वाचणारं कुणी असेल किंवा त्यांच्या वडिलांना, जाणकारांना आमच्यापेक्षा जास्त माहिती असेल तर तो त्यांचा भाग आहे. पण आमची माहिती अशीच आहे की, रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते.

रावसाहेब दानवे पुढे म्हणाले की, हे आमचं मत आहे, त्यामुळे मत मांडायला आम्ही कुणाला नाही म्हणत नाही. मी माझं मत मांडलं, त्यांनी त्यांचं मत मांडलं, त्यामुळे टीका करण्याचं काय कारण आहे, असंही दानवे म्हणाले. रावसाहेब दानवे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे आता त्यांच्या विरूध्द देखील महाविकास आघाडीतील घटकपक्ष आणि सामाजिक संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Protected Content