पहूर ता.जामनेर (प्रतिनिधी)। जिल्हा कोवीड रुग्णालयाने कोरोनासंशयीत रुग्णांसाठी येथील शाळा स्थानिक प्रशासनच्या बैठकीत अधिग्रहित करण्यात आले होते. त्यानुसार ११ रूग्ण उपचारासाठी दाखल आहेत. मात्र कोवीड सेंटरमधील रूग्णांना त्वरीत येथून हलवा, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
पहूर पेठ येथील महावीर पब्लिक स्कूल, पहूर कसबे येथील आर.टी. लेले हायस्कूल व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय या तीनही शाळांना आलेल्या संशयीत रुग्णांना उपचारार्थ ठरल्यानुसार आज पहूरच्या कोवीड रुग्णालयात ११ रूग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. पैकी आठ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांना आर.टी. लेले. हायस्कूलमध्ये संस्थात्मक विलीनीकरण करण्यात आले तर तिघांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला.
दरम्यान सदर रूग्णांना लेले हायस्कूलमध्ये आणताच स्थानिक रहिवाशांनी तोबा गर्दी करत या रूग्णांना येथून त्वरित हलवा अशी मागणी करून विरोध केला. माजी पं.स.सभापती बाबुराव घोंगडे यांनी नागरिकांची समजूत काढून वेळ मारून नेली. मात्र काहीवेळान॔तर पहूर पेठचे सरंपच पती रामेश्वर पाटील यांनी ग्रामस्थांतर्फे ठरल्याप्रमाणे या रूग्णांना अगोदर महावीर पब्लिक स्कूल याठिकाणी तात्काळ हलवा अशी प्रशासनाकडे मागणी केली. २ तासात हे रूग्ण महावीर पब्लिक स्कूल येथे न हालविल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. मुख्याध्यापक सी.टी. पाटील, आर.बी. पाटील, व्हा.चेअरमन साहेबराव देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी वाद सुरू असतांना सपोनि राकेशसिंह परदेशी यांनी हा वाद वाढु नये म्हणून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या पोलीस स्टेशन मधील आराम कक्षात रुग्णांना नेण्याची तयारी दर्शविली. तहसीलदार अरूण शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी कोवीड रुग्णालयात भेट देवून स्थानिक प्रशासनाने हा वाद मिटवून ज्या ठिकाणी हे रूग्ण हलविल्या जातील. त्या ठिकाणी रुग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला.
शिवनगर परिसरातील ग्रामस्थांचा दांगडो
दरम्यान महावीर पब्लिक स्कूल येथे रूग्ण हलविण्याची माहिती शाळेजवळील लागून असलेल्या शिवनगर या वस्तीतील नागरिकांना कळताच शेकडो महीला व पुरूष यांनी या ठिकाणी रूग्ण आणू नये यासाठी दांगडो केला. यावेळी गटविकास अधिकारी एकनाथ लोखंडे, बाबूराव घोंगडे, सपोनि राकेशसिंह परदेशी, अनिल अहिरे यांनी लोकांची समजूत काढली. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी डी. पी. टेमकर, तलाठी सुनील राठोड आदी उपस्थित होते.