पहिला सूर्योदय बालकवी पुरस्कार प्राचार्य डॉ. सावंत यांना जाहीर

 

नाशिक, प्रतिनिधी । सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने मंडळाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमीत्त साहित्य सेवेबद्दल प्रथम वर्षाचा सूर्योदय बालकवी पुरस्कार नांदेड येथील प्रसिद्ध लेखक प्राचार्य डाॅ सुरेश सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे.

पहिला सूर्योदय बालकवी पुरस्कार  प्राचार्य डाॅ सुरेश सावंत यांना देण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी जाहीर केले आहे. रोख रक्कम, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून सावंत यांची या पुरस्कारासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले ,प्रा.डॉ. सदानंद मोरे यांच्या सह महाकवी सुधाकर गायधनी , प्रा. डॉ. म. सु. पगारे, डॉ. अनुपमा उजगरे , सौ माया दिलीप धुप्पड सौ लीला शिंदे या निवड समितीने ही निवड केलेली आहे.  सावंत यांना भारत सरकारचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासह महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार, अनेक साहित्य मंडळांचे पुरस्कार. सूर्योदय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासह अनेक साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भूषवलेली आहेत. आजमितीस त्यांच्या नावावर ४० ग्रंथसंपदा प्रकाशित असून त्यात कविता संग्रह,
बालसाहित्य, चरित्रात्मक ग्रंथ यांचा समावेशआहे. त्यांच्या प्रकाशित ग्रंथांना राज्यशासनासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार प्रदान सोहळा २०२१ मध्ये नाशकात होणार असल्याचे शहराध्यक्ष सावळीराम तिदमे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Protected Content