जळगाव प्रतिनिधी । पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन न थांबता पर्यावरण संवर्धन विषय हा मुळात आपले कर्तव्य म्हणून आयुष्यभर अंगीकारला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. माझी वसुंधरा अभियानादरम्यान “हरित शपथ”कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या नवी इमारत येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, कृषी अधिकारी वैभव शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी एस.अकलाडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री.राऊत म्हणाले की हे फक्त शासकीय कामकाज न समजता पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे तसेच आपण राहत असलेल्या मूळ गावात आपण पर्यावरणाचा विकास केला पाहिजे. माझी वसुंधरा अभियानादरम्यान 1 जानेवारी ते 15 जानेवारी याकाळात हरित शपथ स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हाभरातील शासकीय महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहेत. अभियानात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी केले.