पन्नास टक्के क्षमतेने नाटय़गृहे खुली करण्याची मागणी

 

पुणे : वृत्तसंस्था । कलाकारांचे जगणे थांबवू नका, अशी विनंती करत १ जूनपासून पन्नास टक्के क्षमतेने नाटय़गृहे सुरू करण्याची मागणी कलाकारांनी राज्य शासनाकडे केली आहे.

 

कोरोनाचा संसर्ग कमी होऊ  लागल्याने निर्बंध शिथिल करताना नाटय़गृहे  पन्नास टक्के उपस्थितीच्या नियमानुसार पुन्हा खुली करावीत, अशी मागणी सांस्कृतिक क्षेत्रातून होत आहे. नाटय़गृहे, तमाशा फड, लावणी केंद्र व्यावसायिक आणि लोककलाकार सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळण्यास तयार आहेत. सरकारने कलाकारांचे जगणे थांबवू नये, अशी याचना कलाकारांनी केली आहे.  १ जूनपासून काही जिल्ह्य़ातील कडक निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. शहरात   पहिली लाट उतरणीला लागल्याने गेल्यावर्षी ५ नोव्हेंबरपासून नाटय़गृहं सुरू केली होती. पन्नास टक्के आसनक्षमतेनुसार प्रयोग करू द्यायचे नसतील तर कलाकारांनी काय करायचे आणि दररोजचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न लावणीनिर्माते शशी कोठावळे यांनी उपस्थित केला आहे.

 

कोरोना सुरू होण्यापूर्वी तीन दिवस नाटय़गृहात आणि इतर दिवशी बाहेर काम मिळायचे. सध्या बाजारपेठेत पार्सलची कामे शोधावी लागत आहेत. काम मिळेलच याची शाश्वती नसते, असे प्रकाश आणि ध्वनिव्यवस्था सांभाळणारे प्रशांत भोसले, गणेश शेडगे आणि अतुल गायकवाड यांनी सांगितले.

 

नाटकांचे फलक रंगविण्याचे काम गेल्या २५ वर्षांपासून करणारे बाळकृष्ण कलाल म्हणाले, की एका फलकासाठी दोनशे रुपये मिळतात. पण, नाटय़प्रयोग बंद असल्याने काम थांबले आहे. परिस्थिती सामान्य होण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. सध्या मदतीवर गुजराण सुरू आहे. बालगंधर्व रंगमंदिरात नेपथ्य लावण्याचे काम करणारे गणेश माळवदकर आणि अशोक सोनावळे यांनी रंगमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ताक विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

 

Protected Content