जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या प्रयत्नांनी पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत केळीसोबत इतर प्रक्रिया उद्योगांचा समावेश करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीतून देशभरात सुरू करण्यात आलेली पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचे निकष शिथिल करण्यात आले आहेत. यात नव्याने केळी सोबतच इतर प्रक्रिया उद्योगाला बळ मिळणार असून यापूर्वी नव्याने केळी प्रक्रिया उद्योग सुरू करणारे शेतकरी/गट/महिला बचत गट/शेतकरी उत्पादक कंपनी यांना सदरील योजनेत ३५% टक्क्यांपर्यंत अनुदान देय होते.परंतु याबाबत शेतकर्यांकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय यांना एक जिल्हा एक उत्पादन व्यतिरिक्त नव्याने कृषी/ अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छिणार्या लाभार्थ्यांना करिता ओडीओपी म्हणजेच एक जिल्हा एक पीकची अट शिथिल करण्याबाबतची मागणी करीत पाठपुरावा केला होता.त्याअनुषंगाने एक जिल्हा एक उत्पादन व्यतिरिक्त कुठल्याही पिकांमध्ये नव्याने प्रक्रिया उद्योग सुरू करु इच्छिणार्यांना सदरील अट शिथिल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात योजनेचा फायदा होणार असल्याने शेतकरी, राज्यातील बेरोजगार तरुण, तरुणी बचत गट यांना फायदा होणार असल्याची माहिती जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी दिली आहे.
ही योजना शहरी आणि ग्रामीण भागासाठी आहे. या योजनेचा लाभ कोणीही घेऊन आपला उद्योग सुरू करू शकते निकष शिथील केल्याचा फायदा महिला बचत गट, शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासह तरुण बेरोजगार यांनी घ्यावा. योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपल्या जवळच्या जिल्हा संसाधन प्रतिनिधी अथवा तालुका कृषी विभागाशी संपर्क साधावा.या केंद्र सरकारच्या योजनेचा अधिकाधिक आर्थिक लाभ घ्यावा. असे आवाहन खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केले आहे.