आता नेहरूंना ईडीने नोटीस बजावल्यास नवल नको ! : राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गांधी माता-पुत्राला ईडीने नोटीस बजावल्यावर खोचक भाष्य करत संजय राऊत यांनी ईडीने नेहरूंना नोटीस बजावल्यास नवल नको अशी टीका केली आहे.

संजय राऊत यांनी सामनातल्या आपल्या रोखठोक या सदरातून नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवलेलं नॅशनल हेराल्ड हे स्वातंत्र्यलढ्याचं मिशन होतं. या वृत्तपत्राचा इंग्रजांनी इतका धसका घेतला होता, की १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या वेळी नॅशनल हेराल्डवर बंदी घातली होती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी या वृत्तपत्राची निर्मिती झाली. लढणार्‍यांसाठी ते हत्यार होते. अर्थार्जनासाठी सुरू केलेला तो व्यवसाय नव्हता.

या लेखात पुढे म्हटले आहे की, १ एप्रिल २००८ रोजी हे वृत्तपत्र बंद करण्यात आलं. त्याची मालकी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडकडे होती. या कंपनीवर ९० कोटींहून जास्त कर्ज होतं. हे कर्ज फेडण्यासाठी यंग इंडिया लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली. त्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधींची ३८-३८ टक्के भागीदारी होती. एजीएलचे ९ कोटी शेअर्स या कंपनीला १० रुपये भावाने विकण्यात आले. १९३८ साली या शेअर्सचा भाव १० रुपये होता. डॉ. सुब्रह्मण्यम स्वामींचा आरोप आहे की कोणताही व्यवसाय नसताना ही कंपनी ५० लाखांच्या बदल्यात २ हजार कोटींची मालक बनली. पण या संपूर्ण व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार कुठेच झाला नाही. गुन्हेगारी व्यवहाराला पैसा वापरला असे दिसत नाही. तरी ईडीनं तिथे प्रवेश केला.

राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, पंडित नेहरूंची ही संस्था टिकावी म्हणून कॉंग्रेसनं काही उलाढाली केल्या असतील. अशा उलाढाली संघ परिवारातील अनेक संस्था करतात. पीएम केअर फंडापासून भाजपाच्या खजिन्यात जमा होणार्‍या शेकडो कोटींच्या रकमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेच आहे. पण नेहरूंचा हेराल्ड गुन्हेगार ठरला! नेहरूंना ईडी, सीबीआयची नोटीस पोहोचवल्यावरच काही जणांचा आत्मा शांत होईल! या प्रकरणात नेहरूंनाच नोटीस बजावून त्यांच्या स्मारकावर ती चिकटवली तरी आश्चर्य वाटायला नको, अशा शब्दांत राऊतांनी खोचक टोला लगावला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!