अमृतसर : वृत्तसंस्था । पंजाबमध्ये भाजपाला धक्का बसला असून स्थानिक संस्था निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. सहा महापालिकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे
मतमोजणी अद्यापही सुरु असून आतापर्यंत सातपैकी सहा महापालिकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे. मोगा, होशियारपूर, कपूरथला, अबोहर, पठाणकोट आणि बठिंडा महापालिकांमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. बठिंडा पालिकेतील निकाल हा सर्वात आश्चर्यचकित करणारा असून जवळपास ५३ वर्षांनी काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली आहे.
बठिंडा लोकसभेचं नेतृत्व शिरोमणी अकाली दलच्या हरसिमरत बादल करत असून नुकतंच कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन त्यांनी मित्रपक्ष भाजपासोबतची युती तोडली आहे. काँग्रेस आमदार आणि राज्याच्या अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल बठिंडा विधानसभेचं नेतृत्व करतात. शिरोमणी अकाली दलचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्या त्या चुलत बहिणदेखील आहेत. त्यांच्यासाठी ही पालिका निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती.
हा निकाल भाजपासाठी खूप मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. कारण भाजपाकडे शहरी मतदारांचा पक्ष म्हणून पाहिलं जात होतं. पण कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शिरोमणी अकाली दलने युती तोडल्यापासून चित्र बदलल्याचं दिसत आहे. १४ फेब्रुवारीला १०९ नगपालिका, नगर पंचायत आणि सात महापालिका निवडणुकीसाठी मतदान झालं. कृषी कायद्यांवरुन आक्रमक आंदोलन सुरु असताना एकूण ७१.३९ टक्के मतदानाची नोंद झाली होती.