खडसेंना विरोध कायम राहणार- आ. चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर प्रतिनिधी । एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला असला तरी आपला त्यांना प्रखर विरोध राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.                      

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दुपारी एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देवून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली. खडसे यांच्या घोषणेमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी ऐन वेळेला बंडखोरी केली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केल्यामुळे ते राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार म्हणून आता विधानसभेत आहेत. आज एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत जाण्याची घोषणा केल्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील नेमकी काय भूमिका घेणार याबाबत संभ्रमाचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर सायंकाळी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी आपला खडसे विरोध कायम असल्याचे दाखवून दिले.                                      

याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की एकनाथराव खडसे यांनी पहिल्यापासून शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न केले आहे. त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दबावाचे तंत्र उपयोगात आणले आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत लोकांनी आपल्याला कौल दिला असून आपण जनतेची सेवा करतच राहणार आहोत. खडसे यांनी दबावतंत्र अवलंबल्यास आपण शिवसेना स्टाईलने उत्तर देणार असा इशारा त्यांनी दिल आणि आपण खडसे यांच्या विरोधातच कायम राहणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी स्पष्टपणे सांगितले.

 

Protected Content