मनोज जरांगे यांच्या मोर्चाचा पहिला मुक्काम त्यांच्या मूळगावी

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हजारो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. पायी प्रवास करत 26 जानेवारीला जरांगे हे मुंबईत पोहचणार आहे. या काळात काही ठिकाणी मुक्काम देखील केले जाणार आहे. आज त्यांचा पहिला मुक्काम त्यांच्या जन्मगावी होणार आहे.

विशेष म्हणजे मुंबईला निघालेल्या पायी दिंडीचा पहिला मुक्काम जरांगे यांच्या जन्मगावी मातोरीत होणार आहे. तर, मातोरीतील गावकऱ्यांनी दिंडीत सहभागी मराठा आंदोलकांच्या जेवणाची व राहण्याची सोय केली आहे. यासाठी 300 एकरावर मंडप आणि 200 पोती बुंदी अशी तयारी करण्यात आली आहे.

त्यामुळे मुक्कामी असणाऱ्या मराठा आंदोलकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था शिरूर, पाटोदा, आष्टी तालुक्यातील मराठा समाजबांधव यांच्याकडे असणार आहे. त्यानुसार गावकऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या मराठा आंदोलकांसाठी 200 पोते बूंदी, 6 लाख भाकरी, 300 क्विंटलची भाजी तयार केली जात आहे. सोबतच, पिण्याच्या पाण्यासाठी शंभर टँकर, दोन लाख पाण्याच्या बाटल्या व अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था देखील असणार आहे. आंदोलकांच्या आरामासाठी 300 एकरवर मंडप व वाहनतळासाठी पार्किंगची सुद्धा व्यवस्था केली गेली आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या पायी दिंडीमधील मराठा बांधवांसाठी कोळगाव मध्ये 70 क्विंटल खिचडीचे नियोजन करण्यात आले आहेत. एकही मराठा मावळा उपाशी जाता कामा नये असे नियोजन मराठा बांधवांकडून करण्यात येत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवालीमधून मुंबईच्या दिशेने निघाले असून, त्यांचे दुपारचं जेवण गेवराईच्या कोळगावमध्ये होणार आहे. त्याकरिता कोळगाव परिसरातील गावकऱ्यांकडून जवळपास 70 क्विंटल खिचडी आणि वीस क्विंटलचा उपमा, पुरी, बाजरीच्या भाकरीचे नियोजन करण्यात आले आहेत.

काल मध्यरात्रीपासून अनेक जणांनी आंतरवाली सराटीकडे मार्गक्रमण सुरू केल्याचे चित्र मराठवाड्यात होते. तसेच, आज पहाटेपासूनच आंतरवाली सराटीकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली होती. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण, निलंगा, औसा, अहमदपूर, चाकूर, उदगीर, जळकोट, देवणी, शिरूर ताजबंद, याचबरोबर अनेक गावातून मराठा समाज बांधव हा आरक्षण आंदोलनात सहभागी होण्यासाठी आंतरवालीमार्गे मुंबईकडे निघाले आहेत. 30 हजारपेक्षा अधिक मराठा आंदोलक लातूर जिल्ह्यातून मुंबईकडे निघाले आहेत.

Protected Content