न्यूझीलंडच्या एजाज पटेलचा पराक्रम, एका डावात घेतले १० बळी

मुंबई प्रतिनिधी |  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा गोलंदाज एजाज पटेलने भारताचे सर्वच्या सर्व म्हणजे १० बळी घेण्याचा पराक्रम केला. याआधी जीम लेकर आणि अनिल कुंबळे यांनी केलेल्या विक्रमाची त्याने बरोबरी केली आहे.

 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसर्‍या कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर हा खेळ सुरू आहे. टीम इंडियाने कालच्या ४ बाद २२१ धावसंख्येपुढे फलंदाजी करण्यास सुरुवात केली. पण भारताची सुरुवात खराब झाली. भारताचा डाव १०९.५ षटकात ३२५ धावांत संपुष्टात आला. किवी गोलंदाज एजाज पटेलने  एका डावात १० विकेट घेवून नवा इतिहास रचला. यपूर्वी इंग्लंडच्या जीम लेकर (१९५६), भारताचा अनिल कुंबळे (१९९०) यांनी एका डावात १० विकेट्स घेण्याची किमया केली होती.

न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू एजाज पटेल याचा जन्म मुंबईत झाला आहे. त्याने शुक्रवारी भारताविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी चार विकेट घेण्याची किमया केली होती. तर शनिवारी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी त्याने आणखी सहा विकेट घेवून विक्रम स्थापीत केला. काल दिवसभराच्या खेळात एजाजने २९ षटकांत ७३ धावा देत ४ बळी घेतले. यादरम्यान त्याने १० षटकेही निर्धाव टाकली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ४ बाद २२१ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात एजाजने भारतीय कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा आणि रविचंद्रन अश्विन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कोहली, पुजारा आणि अश्विन यांना खातेही उघडता आले नाही.

खेळाच्या दुसर्‍या दिवशी लंच ब्रेकनंतर पुन्हा एकदा एजाजच्या फिरकीची जादू पहायला मिळाली. त्याने ९९.५ व्या षटकात शतकवीर मयंक अग्रवालला आपल्या जाळ्यात अडकवले. टॉम ब्लंडेडने मयंकचा झेल पकडला. मयंकने ३११ चेंडूत १७ चौकार ४ षटकारांच्या जोरावर १५० धावा केल्या. त्यानंतर १०८ व्या षटकांच्या शेवटच्या चेंडूवर एजाजने अर्धशतकवीर अक्षर पटेलला पायचित केले. ही त्याची आठवी विकेट होती. अक्षरने १२८ चेंडूत एक षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. त्यानंतर १०९.२ व्या षटकांत जयंत यादवची विकेट घेवून तो विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर पोहचला. अखेर १०९. ५ व्या षटकात एजाजने मोहम्मद सिराजला बाद करत एकाच डावातील १० वा बळी मिळवला.

Protected Content