जळगाव (प्रतिनिधी) शहरातील निवृत्ती नगर परिसरात मुबलक पाणी येत नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे समोर आल्याने सोमवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सकाळीच त्याठिकाणी भेट दिली. यावेळी परिसरातील नागरिकांशी चर्चा करून पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे निवृत्ती नगरसाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकावी अशा सूचना महापौरांनी दिल्या.
निवृत्तीनगरात पाहणी करताना नगरसेवक कैलास सोनवणे, आबा कापसे, मयूर कापसे, विजय पाटील, नगरसेविका प्रतिभा देशमुख, गजानन देशमुख, अभियंता शिरसाठ, व्हॉल्वमन अल्ताफ पठाण व नागरीक उपस्थित होते. निवृत्ती नगरातील परिसर चढउताराचा असल्याने त्या ठिकाणी पाणी कमी दाबाने पुरवठा होत होता. दरम्यान मनपा प्रशासनाने ती अडचण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी नवीन व्हॉल्व्ह बसवला तसे केल्याने तीन गल्ल्यांना पाणी कमी दाबाने येऊ लागले. गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांची ओरड होत असल्याने पाण्यावरून वाद होत होते. नागरिकांची अडचण जाणून घेण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. संबंधीत परिसराला योग्य दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी गुजराल पेट्रोल पंपापासून नवीन पाईपलाईन जोडणी करणे आवश्यक असल्याचे अभियंत्यांनी लक्षात आणून दिले. महापौर भारती सोनवणे यांनी त्यासाठी तात्काळ प्रस्ताव तयार करून सादर करावा, अशा सूचना केल्या.