मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेच्या मालकीवरून निवडणूक आयोगात शिंदे गटाने तक्रार केली असून यांच्या विरोधात उध्दव ठाकरे यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षावर दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला बहुमताचा कागदोपत्री पुरावे सादर करण्याचा निर्देश दिला आहे. यासाठी ८ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणही कोणाकडे राहणार याबाबतही ८ ऑगस्टला फैसला होणार आहे.
दरम्यान, उध्दव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका सादर केली आहे. या याचिकेत ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटाच्या मागणीवरून निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या कार्यवाहीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग यावर कार्यवाही करू शकत नाही, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या याचिकेत करण्यात आला आहे.