निवडणूक आयोगाची गाडी खराब, भाजपाची नियत खराब, लोकशाहीची हालत खराब

 

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था|  राहुल गांधी यांनी अगदी मोजक्या शब्दात लोकशाहीवरुन भाजपाला सुनावलं आहे. निवडणुक आयोगाची गाडी खराब, भाजपाची नियत खराब आणि लोकशाहीची परिस्थिती खराब, असं म्हणत ईव्हीएम हॅशटॅगसहीत राहुल गांधींनी ट्विट केलं आहे.

 

आसामसहीत पाच राज्यांमध्ये सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण चांगलच तापलेलं आहे. गुरुवारी आसामसहीत पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. मात्र आता या मतदनानंतर आज भाजपाच्या एका उमेदवारीच्या गाडीमध्ये ईव्हीएम मशीन्स आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला आहे. भाजपा उमेदवाराच्या गाडीमध्येच ईव्हीएम सापडल्याने काँग्रेसने यावरुन टीका करण्यास सुरुवात केलीय. इतर विरोधी पक्षांनाही भाजपावर टीका करत निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केलीय. असं असतानाच आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनाही ट्विटरवरुन यासंदर्भात भाजपावर थेट निशणा साधलाय.

 

 

 

निवडणूक आयोगाने यावर खुलासा केला आहे. “ज्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ती कार भाजपा उमेदवार कृष्णेंदू पाल यांची आहे. कृष्णेंदू पाल पाथरकांडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक आयोगाची गाडी बंद पडली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एका गाडीला लिफ्ट मागितली. नंतर ही कार भाजपा उमेदवाराची असल्याचं कळालं,” असं आयोगाने सांगितलं आहे. याच वरुन राहुल यांनी भाजपावर निशाणा साधलाय.

 

लोकांनी या घटनेची तक्रार केल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गाडीमध्ये ना मतदान अधिकारी होता, ना निवडणूक आयोगाचा कर्मचारी. या प्रकरणी निवडणूक आयोगाने करीमगंज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून,  चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Protected Content