जळगाव प्रतिनिधी । शहरातील नीलकमल हॉस्पिटलमध्ये कोरोनाधित महिलेवर उपचार सुरु असतांना तिचा मृत्यू झाला होता. मृताच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करुन नुकसान केल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी डॉक्टरांची तक्रारीवरुन तोडफोड करणार्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील पिंप्राळा परिसरातील शिंदे नगरातील संगिता पांडुरंग पाटील (५०) या महिला कोरोनाबाधित असल्याने त्यांना २९ सप्टेंबर रोजी गंभीर परिस्थिती डॉ. मनोजकुमार टोके यांच्या नीलकमल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. १ ऑक्टोंबर रोजी या महिलेची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते आणि याबाबतची माहिती वारंवार त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. ११ ऑक्टोंबर रोजी या महिलेची प्रकृती अचानक बिघडली व त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यावेळी डॉ. मनोजकुमार यांनी त्यांची तपासणी करीत औषधोपचार सुरु ठेवले मात्र यात त्यांचा मृत्यू झाला.
आयसीयूत जावून तोडला दरवाजा
मृत महिलेचा मुलगा उमेश याला डॉक्टरांनी आपल्या दालनात बोलावून त्यांना रुग्ण मृत झाल्याची माहिती दिली असता ते कॅबीन बाहेर जावून त्यांनी शिवीगाळ करीत आयसीयूमध्ये जावून दरवाजा तोडला. मृताच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या कॅबीनसह इतर साहित्याची तोडफोड करुन सुमारे ५० हजारांचे नुकसान केले. तसेच हॉस्पिटलचे कर्मचारी पवन बिरारी यांना देखील शिवीगाळ करीत मारहाण केली. हॉस्पिटलचे ४९ हजार ९०० रुपये तर मेडीकलचे ५० हजार रुपये असे एकूण ९२ हजार ७४६ रुपये बिल न देता ते त्याठिकाणाहून निघून गेले. याप्रकरणी उमेश पाटील यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध डॉ. मनोजकुमार टोके यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.