अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनधी | निर्माल्य विसर्जन रोखून नदीचे प्रदुषण टाळावे आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे या स्तुत्य हेतूने येथील स्मितोदय फाऊंडेशन नगरपरिषदेच्या सहकार्याने निर्माल्य संकल उपक्रम हाती घेतला असून संकलन केलेले निर्माल्य पालिकेकडे देऊन यातून खत निर्मिती करण्यात येणार आहे.
माजी आमदार तथा स्मितोदय फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्मिता उदय वाघ व उपाध्यक्षा भैरवी वाघ पलांडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी मोठे नियोजन करण्यात आले असून गणेश विसर्जनाच्या पाचव्या, सातव्या, नवव्या आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात जवळपास सर्वच परिसरात १०० पेक्षा अधिक ठिकाणी स्टॉल्स लावून निर्माल्य संकलनाचे कलश ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय नगरपरिषदेच्या मूर्ती संकलन स्थळी देखील निर्माल्य स्वीकारले जाणार आहेत. या उपक्रमासाठी स्मितोदय फाऊंडेशनचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
दरम्यान, गणपती बाप्पाला अर्पण केलेली फुले, हार, बेल,नारळ,दुर्वा,रुई,नैवेद्य,अगरबत्तीचे खोके नारळाच्या करवट्या,सजावटीचे मखर आदी निर्माल्य भावनिकता जपण्यासाठी नदी किंवा तलावात विसर्जन करण्याची प्रथा आहे. परंतु, यामुळे पाण्याचे होणारे प्रदूषण जैवविविधतेला धोका निर्माण करणारे असते. मानवी आरोग्यावर याचे गंभीर परिमाण होत असतात. तसेच नद्या दूषित होऊन पर्यावरणाची मोठी हानी होत असते असे होऊ नये यासाठी आम्ही स्मितोदय फाऊंडेशन च्या माध्यमातून निर्माल्य संकलन करून नगरपरिषदेकडे सुपूर्द करणार आहोत. पालिकेच्या चोपडा रस्त्यावरील प्रकल्पात या निर्माल्यापासून खतनिर्मिती होऊन हे खत शेती व वृक्षवाढीसाठी उपयुक्त ठरेल यातून धार्मिकता आणि पर्यावरण दोन्हीही जोपासले जाणार असल्याने निर्माल्य नदीत विसर्जित न करता स्मितोदय फाऊंडेशनकडे जमा करावे असे आवाहन स्मिता वाघ यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्यादेखील नदीच्या पर्यावरणास घातक असल्याने त्या देखील नदीत विसर्जित न करता नगरपरिषदेच्या मूर्ती संकलन केंद्राकडे द्यावे आणि पुढील वर्षी शाडू मातीच्या मूर्त्यांचीच स्थापना आम्ही करू असा संकल्प गणेश मूर्ती विसर्जनाच्या दिवशी सोडावा असे आवाहन देखील श्रीमती वाघ यांनी केले आहे.